Sunday, February 15, 2026
Homeकोल्हापूरहर हर महादेव. जय भोलेनाथ...; खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात अखंड जयघोषात महाशिवरात्री साजरी

हर हर महादेव. जय भोलेनाथ…; खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात अखंड जयघोषात महाशिवरात्री साजरी

“हर हर महादेव… जय भोलेनाथ…!”च्या अखंड जयघोषात येथे महाशिवरात्री उत्सवाला भक्तिभावपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील ऐतिहासिक कोपेश्वर-धुपेश्वर मंदिरात पहाटेपासूनच धार्मिक विधींना सुरुवात करण्यात आली.

 

महादेव पिंडीवर रघूरुद्र, पंचामृत सेवा, दुग्ध-जल व फुलाभिषेक घालून विधिवत महापूजा करण्यात आली. मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्याने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता.

 

मंदिराचे पुजारी रमेश रघुनाथ जोशी, गणेश रघुनाथ जोशी, गजानन व्यंकटेश जोशी व जोशी कुटुंबीयांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली. शंखध्वनी, डमरूच्या निनादात आणि भोलेनाथाच्या गजरात वातावरण भारावून गेले. महापूजेनंतर भक्तांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. दुपारनंतर आयोजित संगीत सुपद्र कार्यक्रमाने उत्सवात सांस्कृतिक रंग भरले.

 

ग्रामस्थांनी मंदिर परिसर फुलांच्या माळा, विद्युत रोषणाई आणि आकर्षक रांगोळ्यांनी सजवून उत्सवाची शोभा वाढवली. कोपेश्वर उत्सव समितीतर्फे केळी, साबुदाणा-खिचडी तसेच अन्नदानाचे नियोजन करण्यात आले. परगावाहून आलेल्या भाविकांसाठी उपवासाच्या फराळाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. हजारो भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी युवक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत झिग-झॅग पद्धतीने बॅरिकेड्स उभारून रांग व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी केली. त्यामुळे कोणतीही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली नाही.

 

पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. उपअधीक्षक आण्णासाहेब गायकवाड यांनी मंदिरस्थळी भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला. सरपंच सारिका कदम, सपोनि संतोष माने, उपनिरीक्षक जीवन पाटील, विवेक कराडे, पोलीस पाटील दीपाली पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे उत्सव अधिक शिस्तबद्ध व सुरक्षित वातावरणात पार पडला.

 

महाशिवरात्री निमित्त मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी दिवसभर खुले ठेवण्यात आले असून महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे.दरम्यान, कुरुंदवाड येथील कलेश्वर मंदिर तसेच कृष्णा घाटावरील सुब्रमण्यश्वर मंदिरातही दुग्ध-जल व फुलाभिषेक करून महापूजा करण्यात आली. येथेही भक्तांना खिचडी व दुग्धतीर्थ प्रसादाचे वाटप करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -