इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा शिवारात अनिल एकनाथ गिऱ्हे रा. गिऱ्हेवाडी पिंपळगाव घाडगा ता. इगतपुरी याचा खून झाला असल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. वाडीवऱ्हे पोलिसांना याबाबत समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन कसून तपास सुरु केला.
आणि अवघ्या दोन तासात संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, भाडेकरू महिला मंगल वाळू मधेचा मोठा भाऊ अजय रंगनाथ पवार व भावजयी काजल अजय पवार हे ८ दिवसांपूर्वी पिंपळगाव डुकरा येथे आलेले होते. मयत अनिल गिरे व आरोपी अजय पवार हे दोघे रोज एकत्र बसायचे. गुरुवारी रात्री १० च्या सुमारास काजल पवार हिने मंगलला सांगितले कि, अनिल गिऱ्हे आणि अजय पवार हे घरी आल्यानंतर पती मला बोलले की हा अन्या तुझ्या सोबत झोपायचे म्हणत असल्याने त्याचा आज मी काटाच काढतो असे म्हणून त्यांचेत आपसात भांडण चालू झाले आहे. माझे पती रागाच्या भरात काही तरी करतील तुम्ही लवकर घरी चला असे सांगितले.
दोघी घरी आल्यावर अनिल एकनाथ गिऱ्हे हा रक्तबंबाळ गंभीर जखमी अवस्थेत पडलेला दिसला. वाडीवऱ्हे पोलिसांनी अजय रंगनाथ पवारचा परिसरात शोध घेतला. तो एका अंडा भुर्जीच्या गाड्याच्या आडोशाला अंधारात दारूच्या नशेत लपून बसलेला मिळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्याने मयत अनिल गिऱ्हे याने तुझ्या बायको सोबत झोपायचे आहे असे म्हटल्याचा राग आल्याने सांगितले. म्हणून त्याच्याशी गोड बोलून दारू पाजून बहिण मंगल मधेच्या घरी आणून घराच्या मोरीत ठेवलेल्या दगडाने त्याला ठेचून मारले असल्याचे कबुली दिली. वाडीवऱ्हे पोलिसात गुन्हा दाखल झालेला असून वेगाने तपास सुरु करण्यात आला आहे.






