जतमध्ये भरदिवसा भाजप नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या; गोळीबारानंतर डोक्यात घातला दगड

सांगली जिल्ह्यातील जतमध्ये भाजप नगरसेवकाची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. विजय ताड असे भाजप नगरसेवकाचे नाव आहे. ताड यांची इनोव्हा गाडी अडवून अज्ञातांनी गाडीवर हल्ला चढवत ताड यांच्यावर गोळ्या झाडल्या. जतमधील सांगोला रोडवरील अल्फोन्सो स्कूलजवळ भरदिवसा घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आहे. ताड समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली जतकडे रवाना झाले आहेत.

मुलांना शाळेतून आणण्यासाठी निघाले पण…
नगरसेवक विजय ताड हे आपल्या इनोव्हा गाडीतून सांगोला रोडवरील असणाऱ्या स्कूल या ठिकाणी आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी निघाले होते. अल्फान्सो स्कूलजवळ पोहोचले असता ताड यांचा पाठलाग करणाऱ्या अज्ञात हल्लेखोरांनी ताडे यांची गाडी अडवली आणि त्यांच्या गाडीवर हल्ला करत ताड यांच्यावर थेट गोळ्या झाडल्या. ज्यामध्ये जागीच गतप्राण झाले. या घटनेमुळे जत शहरासह जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मात्र, हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून आणि कोणी केला हे मात्र समजू शकलेलं नाही.

Join our WhatsApp group