वरदचा नरबळी की…खून?

सोनाळी (ता. कागल) येथील सात वर्षांचा निष्पाप बालक वरदचा नरबळी की, खून? अशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांकडून तपास यंत्रणा गतिमान करण्याची गरज आहे.



17 ऑगस्ट रोजी वरदचा त्याच्या वडिलांच्या मित्राकडूनच खून झाला. या खुनाची कबुलीही आरोपी दत्तात्रय ऊर्फ मारुती तुकाराम वैद्य (वय 44, रा. सोनाळी) याने पोलिसांसमोर दिली आहे; पण हा खून कोणत्या कारणाने झाला? याची संभ्रमावस्था तयार होताच आरोपीने आपल्याला अपत्यप्राप्‍ती व्हावी, या उद्देशाने वरदचा नरबळी दिल्याची चर्चा सुरू आहे; पण पोलिसांना याचे कोणतेच धागेदोरे सापडत नाहीत. त्यामुळे खून कोणत्या कारणाने झाला? हे शोधण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

सोनाळी(sonali) व सावर्डे(savarde) गावच्या ग्रामस्थांनी मुरगूड पोलिस ठाण्यासमोर मोर्चाने येऊन आपल्या संतप्‍त भावना व्यक्‍त केल्या. हा नरबळीचाच अघोरी प्रकार आहे. यातील दोषींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे व वरदला न्याय मिळालाच पाहिजे, अशी ठाम मागणी ग्रामस्थ व पीडित पाटील कुटुंबीयांची आहे. अन्य सामाजिक व राजकीय संघटनांनीसुद्धा या खुनाची पोलिसांनी नि:पक्षपातीपणे चौकशी करावी व आरोपीला कठोर शिक्षा देण्याची भूमिका मांडली आहे.

या निष्पाप वरदचा काहीही दोष नसताना बळी गेल्याने संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. अशा अतिसंवेदनशील व भावनिक परिस्थितीत व कायद्याच्या चौकटीत राहून पोलिसांना तपास करावा लागत आहे. या खुनासंबंधी कोणतेच ठोस पुरावे व धागेदोरे पोलिसांच्या हाती नसल्यामुळे मोठ्या सत्त्वपरीक्षेला पोलिसांना सामोरे जावे लागणार आहे. तसेच जनतेच्या रोषालादेखील सामोरे जावे लागत आहे.



निष्पाप जीव गमावल्याची भावना सर्वांच्याच मनी दाटून आली आहे. त्यामुळे या घटनेमागील वास्तव लवकर उजेडात यायला हवे, अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Join our WhatsApp group