Kolhapur; ओव्हरटेक करताना ट्रकच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वार ठार

ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकच्याच मागील चाकाखाली अडकल्याने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. रूपेश लक्ष्मणराव शेलार (वय वर्षे ३८, रा. उदगाव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. शिरोली औद्योगिक वसाहतीमधील हॉटेल डोंगराईसमोर शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी, रूपेश शेलार हा आपल्या मोटरसायकलवरुन शिरोली औद्योगिक वसाहतीमधून कसबा बावडा येथे निघाला होता. दुपारी जेवणाची वेळ असल्याने हॉटेल डोंगराईसमोर वाहनांची गर्दी होती. त्यामुळे शेलार यांच्या मोटारसायकल समोर असणारा ट्रक सावकाश निघाला होता. या ट्रकला ओव्हरटेक करुन पुढे जाण्यासाठी शेलारनी आपली मोटारसायकल वेगाने पुढे घेतली. पण त्याचवेळी समोरून दुसरे वाहन येत असल्याने शेलार यांनी आपली मोटारसायकल ट्रकला घासून चालवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ट्रकचा नकळत धक्का लागल्याने शेलार यांची मोटारसायकल ट्रकच्या मागील चाकाखाली अडकली. तरीही ट्रक पुढेच निघाला होता. यामध्ये ट्रकसोबत शेलारही काही अंतर फरफटत गेले. यामध्ये शेलार यांचा मृत्यू झाला.

रूपेश शेलार हे मुंबईतील एका खाजगी कंपनीत मार्केटिंगचे काम करत होते. कामाची ऑर्डर घेवून ते कसबा बावड्याकडे व औद्योगिक वसाहतीमधील कंपनीत जात होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी असा परिवार आहे. अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे.

Join our WhatsApp group