पावसाचा धिंगाणा; कोल्हापुरात ढगफुटी, दिवाळीत अनेक संसार उघड्यावर

राज्यात परतीच्या पावसाने जोरदार दणका दिला आहे. पुणे शहरात जोरदार पाऊस झाल्यानंतर आता कोल्हापुरात अनेक भागात पुन्हा ढगफुटी सदृश पाऊस पडलाय. मध्यरात्री जयसिंगपूर परिसरात ढगफुटी झाल्याने अनेक घरात पाणी शिरले तर सकल भागात तीन ते चार फूट पाणी साचले होते.
यामुळे ऐन दिवाळीत अनेक कुटुंबियांचे संसार उघड्यावर आलेयत.

कोल्हापुरात परतीच्या पावसाने धिंगाणा घातल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस कोसळला होता. पुन्हा काल रात्री बारा वाजता सुरु झालेला पाऊस मध्यरात्री तीन वाजेपर्यंत विजेच्या कडकडाटासह पडत होता. ढगफुटी स्वरुपात पाऊस झाल्याने रात्री अनेकांची तारांबळ उडाली. या पावसाने घराघरात पाणी घुसल्याने अनेकांचे संसार पाण्यात गेलेत. तर रात्रीत अनेक कुटुंबांनी जीव वाचवत घरं सोडली. सिद्धेश्वर पार्क आणि यड्रावकर कॉलनी मधील 20 ते 25 घरं पाण्यात गेल्याने मोठे नुकसान झाले. ऐन दिवाळीत मोठे नुकसान सोसावे लागल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे.

दरम्यान, मान्सूनचा परतीचा प्रवासानं वेग घेतलाय. पुढील दोन दिवसांत मुंबई-पुण्यासह संपूर्ण राज्यासह देशातून मोसमी वारे माघारी जातील, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. दोन दिवसांच्या कालावधीत केवळ दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक भागांत हलक्या सरींची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात दोन दिवसात कोरडं हवामान राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. अरबी समुद्रातील बाष्पामुळे मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सात ते आठ दिवसांनी लांबला.

Join our WhatsApp group