Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर सोशल डिस्टन्सचा फज्जा : हे वागणं बरं नव्हं..!

कोल्हापूर सोशल डिस्टन्सचा फज्जा : हे वागणं बरं नव्हं..!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत चालली आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्रबोधन सुरू आहे. असे असतानाही कोल्हापूरमध्ये सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे. काहींचे मास्क हनुवटीला, तर अनेकजण विनामास्क बिनधास्त फिरताना दिसत आहेत. इतकेच काय, अनेक तरुण दुचाकीवरून थेट थुंकीचा फवारा मारतात. ‘अंगावर थुंकी उडते, जरा बाजूला जाऊन थुंका,’ असा सामान्य नागरिकांनी सल्‍ला दिला तर ‘रस्ता काय तुझ्या बाचा आहे का?’ असे उद्धट उत्तर कोल्हापूरकरांकडून मिळते. अशा फाजिल आत्मविश्‍वासामुळेच कोल्हापूरभोवती पुन्हा कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे.

कोरोना काळात काही लोकांना मास्क, सॅनिटायझर,सोशल डिस्टन्स या कोरोना संरक्षक त्रिसूत्रीचा विसर पडला आहे. केवळ यामुळेच रुग्णसंख्या पुन्हा उच्चांक गाठत आहे. काही लोकांच्या हुमदांडगेपणाचा फटका कोल्हापूरकरांना बसत आहे.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता. दररोज होणार्‍या मृत्यूंचा आकडा इतका होता की, स्मशानभूमीत वेटिंग होते. बेड, व्हेंटिलेटरअभावी आपल्या जिवलगांचा तडफडत मृत्यू होताना कोल्हापूरकरांनी डोळ्यांदेखत पाहिला. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी कोल्हापूरकरांना विनाकारण होणारी गर्दी टाळावीच लागणार आहे; अन्यथा पुन्हा कोरोनाच्या विळखा घट्ट होत जाईल, हे निश्‍चित!

निर्बंध शिथिल होताच कोल्हापूरकरांच्या तोंडावरील मास्क अडगळीत पडले. तर काहींजवळ मास्क फक्‍त नावालाच आहेत. शासकीय अधिकार्‍यांपासून ते सर्वसामान्य नागरिक विनामास्क फिरताना दिसताहेत. या कोरोना दुतांमुळे रुग्णसंख्येत वाढ होणार हे निश्‍चित. प्रशासनाकडून कारवाई, आर्थिक दंडाची प्रतीक्षा न करता आपली आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी लक्षात घेऊन कोरोना संरक्षक त्रिसूत्रीचे पालन करणे गरजचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -