Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : राजकारणाचा नवा डाव सुरू

कोल्हापूर : राजकारणाचा नवा डाव सुरू

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत राजकारणाचा नवा डाव मांडण्याची सुरुवात झाली आहे. एकमेकांना दुखावल्याच्या जखमा ओल्या आहेत तोवरच जिल्हा परिषद व पंचायत समिती, बाजार समिती, साखर कारखान्यांच्या निवडणुका येणार आहेत. त्यामुळे टोकाची राजकीय ईर्ष्या दिसणार आहे.

बलाढ्य आर्थिक गड असलेल्या गोकुळ दूध संघात सत्तांतर झाल्यामुळे तेथील विरोधी आघाडीचा विश्‍वास वाढला. त्यातूनच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बिनविरोध निवडीची चर्चा सुरू झाली. राज्यातील सत्तेत एकत्र असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे महाविकास आघाडीतील मित्र पक्ष ‘गोकुळ’च्या सत्तांतरात एकत्र राहिले. ही आघाडी अशीच राहणार, अशी चर्चा केवळ कार्यकर्त्यांमध्येच नव्हे तर नेत्यांमध्येही होती.

तसे वातावरणही तयार झाले होते. मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ, आ. विनय कोरे, खा. संजय मंडलिक यांना विरोध करण्याची मानसिकता ‘गोकुळ’च्या विजयानंतर त्यांच्या पारंपरिक विरोधकांत दिसत नव्हती; मात्र जेव्हा अपेक्षित काही चित्र असते त्याच्या विपरित घडते, असे म्हणतात. जिल्हा बँकेत नेमके तेच घडले.

जिल्ह्याच्या विशेषतः राजकारणाचे विद्यापीठ समजल्या जाणार्‍या कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ आणि खा. संजय मंडलिक हे बर्‍याच कार्यक्रमांना एकत्र असायचे. संजय मंडलिक यांच्या निवडणुकीत मंत्री सतेज पाटील यांच्या ‘आमचं ठरलंय’ या कॅच लाईनने धमाल उडवून दिली होती. त्यामुळे सगळीकडेच ‘आमचं ठरलंय’ हाच फॉर्म्युला सगळीकडे चालणार, याची खूणगाठ कार्यकर्त्यांनी मनाशी बांधली होती.

पण, महाविकास आघाडीच्या नेत्यांतील ऐक्याचा फुगा जिल्हा बँक निवडणुकीतील जागा वाटपावेळ फुटला. शिवसेनेने तीन जागांची मागणी केली होती, तर बँकेतील सत्ताधारी गटाने त्यांना दोन जागा देत एक जागेवर स्वीकृत सदस्य म्हणून संधी देतो, असे सांगितले. त्याचा पर्दाफाश करताना संजय मंडलिक यांनी आमच्या समोरच सत्तारूढ आघाडीच्या नेत्यांनी स्वीकृत संचालकाचा शब्द तिघांना दिल्याचे सांगून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. यामागे शाहूवाडी, पन्हाळा मतदारसंघाचे राजकारण आहे.
विद्यमान आमदार विनय कोरे यांनी पारंपरिक विरोधक अमर यशवंत पाटील आणि कर्णसिंह गायकवाड यांची राजकीय सोय लावून दिली आहे. मात्र, बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर हे त्यांना पॅनेलमध्ये नको होते. त्यामुळे या पॅनेलमधून आसुर्लेकर यांना उमेदवारी नाकारली आणि आसुर्लेकर यांच्यासाठी खा. मंडलिक यांनी सत्ताधारी पॅनेलचा त्याग केला.

यातूनच विरोधी आघाडी उभी राहिली. खा. मंडलिक आणि बाबासाहेब आसुर्लेकर हे सत्ताधार्‍यांना नको होते, तेच नेमके निवडून आले. त्याबरोबर शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांचे बंधू अर्जुन आबिटकर पतसंस्था गटातून निवडून आले आणि शिवसेनेच्या पॅनेलमधून लढलेल्यांना तीन जागा मिळाल्या. संघर्षातून मिळालेल्या यशाचे कौतुक सर्वांनाच होते. शिवसेनेने आयोजित केलेल्या नूतन संचालकांच्या सत्कार समारंभात खा. संजय मंडलिक, अरुण दूधवडकर, सत्यजित पाटील-सरुडकर, चंद्रदीप नरके या शिवसेना नेत्यांनी यापुढील निवडणुका स्वतंत्र लढविण्याचे संकेत दिले.

येणार्‍या निवडणुकीत वाटाघाटी कशा होणार, जागा वाटप कसे होणार, हे नेते पाहतील; मात्र या निमित्ताने राजकारणाचा नवा डाव मांडण्याची सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीतील कुरबूर चव्हाट्यावर आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -