Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रगॅसच्या भडक्याने काचा फुटल्या, दरवाजा तुटला, 6 जण होरपळले!

गॅसच्या भडक्याने काचा फुटल्या, दरवाजा तुटला, 6 जण होरपळले!

गॅस लिकेज होऊन उडालेल्या भडक्यातील दोन घटनांमध्ये नाशिक जिल्ह्यात 6 जण भाजले आहेत. यातील पहिली घटना ही इगतपुरी येथे घडली असून, येथील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. तर दुसरी घटना म्हसगण शेजारील जांभुळपाडा येथे घटली आहे. या घटनेमध्ये चार जण भाजले आहेत.

इगतपुरी येथे मुनाफ शेख यांच्या घरी गॅस गिझर लावण्यात आले आहेच. मात्र, गिझरचा गॅस लिक झाला. घरातील मंडळींनी नेहमीप्रमाणे आंघोळीसाठी पाणी गरम करायला गॅस गिझर सुरू केला. मात्र, त्यामुळे आगीचा मोठा भडका उडाला. या घटनेत मुनाफ शेख भाजले गेले. त्यांनी आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर त्यांचा आवाज ऐकूण त्यांचा मुलगा त्या दिशेने धावला. त्यामुळे तोही भाजला जावून जखमी झाला. मात्र, त्याने प्रसंगावधान राखत दरवाजा बंद केला. मात्र, गॅसचा भपका आणि जोर इतका होता की त्यामुळे बाथरूमच्या काचा फुटून बाहेर पडल्या. दरवाजाही तुटला. यातील जखमी मुलावर इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मुनाफ शेख हे जास्त भाजल्याने त्यांच्यावर नाशिक येथील नारायणी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

गॅस भडक्याची दुसरी घटना नाशिकच्या पेठ तालुक्यातील जांभुळपाडा येथे घडली. या घटनेमध्ये चार जण भाजले आहेत. जांभुळपाडा येथे गॅस जोडणीची तपासणी करण्यासाठी कारागीर आले होते. त्यांनी गॅस व्हॉल्वमधून गॅसची गळती होते की नाही, हे तपासण्यासाठी काडी पेटवली. त्यामुळे गॅसने पेट झाला. त्यात घरातील चार व्यक्ती भाजल्या गेल्या. त्यांच्यावर सध्या पेठ येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.

नाशिक जिल्ह्यात गॅस गळतीमुळे वर्षभरात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. एप्रिलमध्ये सारडा सर्कल येथील संजरीनगर सोसायटीत गॅस सिलिंडर बदलताना गळती झाली. या स्फोटात सात जणांचा मृत्यू झाला होता. वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील भारतनगर झोपडपट्टीमध्ये सिलिंडरचा स्फोट होऊन पाच युवकांचा बळी गेला होता. तर चार सप्टेंबर रोजी एका हॉटेलमध्ये गॅस स्फोट झाल्याची घटना घडली होती. यात स्वयंपाकी रूपेश गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान, नागरिकांनी दक्षता घेतली आणि काही नियम पाळले तर गॅस सिलिंडर गळतीचे अपघात रोखले जाऊ शकतात. त्यासाठी फक्त थोडी दक्षता घ्यावी लागेल.

गॅस गळती होऊ नये म्हणून ही दक्षता घ्या

– गॅस सिलिंडरचे रेग्युलेटर रात्री झोपण्यापूर्वी बंद करावे.

– रेग्युलेटरला अडकावलेले पांढरे झाकण रात्री सिलिंडरला लावावे.

– गॅसचा थोडाही वास आल्यास घराचे दरावाजे, खिडक्या तात्काळ उघडा.

– काडीपेटी, लायटर पेटवू नका. पंखे, बल्बही सुरू करू नका.

– गॅसचा वास जाईपर्यंत काळजी घ्या.

– गॅस गळती झाल्यास सिलिंडर घराबाहेर अथवा मोकळ्या जागेत न्यावे.

– घरात गॅसने पेट घेतल्यास चादर पाण्यात बुडवून ती सिलिंडर भोवती गुंडाळा.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -