भारतीय हवामान विभागाच्या (IMD) प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून राज्यात पुढील तीन ते चार दिवसात राज्यात उष्णतेची लाट येऊ शकते , असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 30,31 मार्च आणि 1 ते 3 एप्रिल रोजी राज्यात उष्णतेची लाट येईल असा इशारा प्रादेशिक हवामान खात्यानं दिला आहे. हवामान खात्यानं दिलेला इशारा खरा ठरत असल्याचं समोर येत असून मार्च महिन्यात तापमान 40 अंशाच्या पुढं गेलं आहे. पुढील तीन चे चार दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये देखील तापमान वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) चंद्रपूर जिल्ह्यातील तापमान 43.4 अंशावर पोहोचलं होतं. चंद्रपूर हे जगातील सर्वात उष्ण शहरांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचलं आहे.
कोणत्या जिल्ह्यात उष्णतेची लाट जाणवणार?
30 मार्च : अहमदगर, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि नागपूर
31 मार्च : अहमदनगर, सोलापूर, जालना, परभणी, यवतमाळ, हिंगोली, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलडाणा, जळगाव
1 एप्रिल : जळगाव, बुलडाणा, अकोला, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, अहमदनगर आणि सोलापूर
2 एप्रिल : बुलडाणा, जालना, परभणी, हिंगोली आणि अकोला
चंद्रपूरमध्ये सूर्य कोपला, 43.4 अंश तापमानाची नोंद
चंद्रपुरात सूर्य कोपल्याचे चित्र आहे. आज जगातील तिसऱ्या उष्ण शहरात चंद्रपूरचा समावेश झालाय. मंगळवारी चंद्रपुरात 43.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. देशाच्या उत्तर भागातून येणारे उष्ण वारे या अचानक तापमानवाढीस कारण ठरले आहेत. यामुळे राज्यातील हवामान अति उष्णतेकडे जाण्याची शक्यता आहे. विदर्भातील शहरे अधिक तापमानाची होऊ लागली आहेत. अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील तापमान देखील 40 अंशाच्या वर गेलं आहे.
उष्णतेची लाट कायम राहणार
भारतीय हवामान विभागाचे नवी दिल्ली येथील शास्त्रज्ञ आर के जेनमानी यांनी नवी दिल्लीतील तापमान 40 अंशाच्या पुढे गेल्याची माहिती दिली. 1 ते 2 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट कायम राहिल. मध्य भारत आणि महाराष्ट्रात उष्णतेची लाट जाणवेल, असं जेनमानी यांनी म्हटलंय. 2 एप्रिल नंतर तापमान कमी होईल, असं त्यांनी म्हटलंय.