‘आयपीएल’मध्ये क्रिकेटसह ग्लॅमरही आहे.. इथं प्रत्येक खेळाडू आपला संघ जिंकावा, यासाठी जिवाची बाजी लावत असतो… त्यातून कधी कधी खेळाडूंच्या रागाचा पाराही चढतो.. यंदाच्या ‘आयपीएल’मध्येही असे वादाचे प्रसंग घडताना दिसताहेत.. आयपीएलच्या मैदानावर नुकताच दोन भारतीय खेळाडूंमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला.
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेटअसोसिएशनच्या मैदानावर ‘रॉयल चैलेंजर्स बंगळुरू’ व ‘राजस्थान रॉयल्स’ (RR Vs RCB) या संघामध्ये 39 वा सामना झाला.. त्यावेळी ‘आरसीबी’चा फास्ट बाॅलर हर्षल पटेल व राजस्थानचा रियान पराग यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली.. पण नेमकं कशामुळे हा वाद झाला, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
नेमकं काय घडलं..?
‘आरसीबी’चा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ‘आरसीबी’च्या गोलंदाजीसमोर ‘राजस्थान’ची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली.. त्यावेळी एका बाजूने राजस्थानचा रियान पराग उभा राहिला.. विस्फोटक फलंदाजी करताना त्याने फक्त 29 चेंडूत ‘आयपीएल’मधील दुसरे अर्धशतक केले..
रियान परागच्या बॅटिंगमुळे राजस्थान संघाला ‘आरसीबी’समोर 145 धावांचे लक्ष्य ठेवता आले.. मात्र, या सामन्यात राजस्थानच्या अखेरच्या षटकादरम्यान हर्षल पटेल व रियान पराग यांच्यात खटका उडाला.
आतापर्यंतच्या हंगामात हर्षलने चांगली बाॅलिंग केलीय. मात्र, राजस्थानविरुद्ध 20वे षटक टाकताना रियान पराग याने त्याच्यावर जोरदार हल्लाबोल केला. रियानने या षटकात 18 धावा चोपल्या. अखेरच्या चेंडूवरही षटकार लगावला. त्यामुळे हर्षलचा पारा चांगलाच चढला होता. तंबूत येताना हर्षल पटेलने रियानला डिवचले.. त्यातून त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. मात्र, इतर खेळाडूंनी त्यांना आवरले..
मात्र, हा वाद इथेच संपला नाही. राजस्थानच्या तोकड्या आव्हानाचा पाठलाग करतानाही ‘आरसीबी’ला धाप लागली.. नि त्यांचा 29 धावांनी पराभव झाला.. ‘आरसीबी’च्या डावात हर्षल पटेल हा सगळ्यात शेवटी बाद झाला. विशेष म्हणजे, रियान पराग यानेच त्याचा झेल घेतला.. त्यानंतर त्यानं जोरदार सेलेब्रेशन केलं.. पण ते हर्षल पटेलला काही पटलं नाही..
मॅच संपल्यावर सगळे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करीत असताना, रियान पराग याने हर्षलच्या दिशेनं हात केला.. पण त्याकडे दुर्लक्ष करीत हर्षल तसाच निघुन गेला.. त्यामुळे रियानने आर्श्चर्य व्यक्त केलं.. त्याचा ‘व्हिडिओ’ही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.