महेंद्रसिंग धोनी वयाच्या ४० व्या वर्षीही क्रिकेटमध्ये चमक दाखवत आहे. वय हा फक्त एक आकडा आहे हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. पुन्हा कर्णधारपद स्वीकारत त्याने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाला विजयाच्या मार्गावर आणले आहे. धोनीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धही धडाकेबाज फलंदाजी केली आहे.
मात्र, या सामन्यादरम्यनचा एक फोटो व्हायरल झाला असून ज्यामध्ये तो आपली बॅट खाताना दिसत आहे. धोनीने (MS Dhoni) बॅट खाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तो अनेकदा बॅट खाताना दिसला आहे. धोनी असे का करतो, याचा खुलासा त्याचा टीम इंडियातील सहकारी अमित मिश्राने केला आहे.
‘धोनीच्या बॅटवर धागा-टेप निघताना दिसणार नाही’
लेगस्पिनर अमित मिश्राने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना हा खुलासा केला आहे. अमितने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘जर तुम्ही विचार करत असाल की धोनी त्याची बॅट का खात आहे, तर तुम्हाला सांगतो की, तो बॅट खात नसतो तर चिकटवलेला टेप काढत असतो. त्याला आपली बॅट स्वच्छ ठेवायला आवडते. धोनीच्या बॅटवर चिकटवलेला टेप लोंबताना दिसणार नाही,’ असा त्याने खुलासा केला आहे.
अमित मिश्रा यावेळी आयपीएल खेळत नाहीय. मेगा लिलावात त्याला कोणीही विकत घेतले नाही. मात्र, त्याने दिल्ली संघाचे मालक पार्थ जिंदाल याला सांगितले की, संघासाठी कोणत्याही भूमिकेसाठी आपण नेहमीच तयार आहोत. आयपीएल न खेळल्यामुळे अमित मिश्रा सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. (MS Dhoni)
चेन्नई संघाने दिल्लीवर ९१ धावांनी मात केली
सीएसकेने रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ९१ धावांनी मोठा विजय नोंदवला. सीएसकेसाठी प्लेऑफमध्ये पोहोचणे अवघड असले तरी सध्या ते अशक्य नाही. आता पाहावे लागेल की धोनीचा करिष्मा यंदा संघाला प्लेऑफमध्ये नेऊ शकेल की नाही? धोनीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ८ चेंडूत २१ धावांची नाबाद खेळी खेळली.
या सामन्यात चेन्नईने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ६ गडी गमावून २०८ धावा केल्या होत्या. संघाकडून डेव्हॉन कॉनवेने ४९ चेंडूत ८७ तर ऋतुराज गायकवाडने ३३ चेंडूत ४१ धावा केल्या. २०९ धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली नाही आणि संघाने ३६ धावांत दोन गडी गमावले. अखेर दिल्लीचा संघ केवळ ११७ धावांवर गारद झाला आणि सामना ९१ धावांनी गमावला. मिचेल मार्शने २५ आणि शार्दुल ठाकूरने २४ धावा केल्या. एकाही फलंदाजाला ३० धावा करता आल्या नाहीत.