ताजी बातमी ऑनलाईन टीम
ऑनलाइन लिंकवर क्लिक करून कर्ज घेतले होते. त्याचे मुद्दल व व्याज त्यांना परतदेखील केले. मात्र, त्यानंतरसुद्धा पैसे भरण्याची मागणी करून शिवीगाळ केली जाऊ लागली. नातेवाइकांनाही शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. काही दिवसांनंतर माझे फोटो अश्लील स्वरूपात मॉर्फ करून बदनामी केली. शेवटी सततच्या त्रासाला कंटाळून पोलिस ठाण्यात तक्रार दिली… ही आपबीती आहे विजय कांबळे (नाव बदलले आहे) या तरुणाची… पुण्यात मागील पाच महिन्यांत अशाप्रकारे 1 हजार 140 पेक्षा अधिक लोकांची फसवणूक झाली असून, अनेकांना बदनामीला देखील सामोरे जावे लागले आहे.
त्यामुळे एखाद्या ऑनलाइन अॅपद्वारे कमी वेळात मिळणाऱ्या कर्जाला भुलून तुम्ही जर ही चूक करत असाल, तर वेळीच सावध व्हा.. कारण पुढील नंबर तुमचादेखील असू शकतो. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तत्काळ ऑनलाइन कर्ज देणाऱ्या बोगस ‘लोन अॅप’चा सुळसुळाट झाला आहे. सूत्रबद्ध पद्धतीने ते नागरिकांना आपल्या जाळ्यात अडकवत आहेत. गरजेपोटी नागरिकदेखील त्यांचे सावज होत आहेत. कर्ज घेतल्यानंतर त्यांच्या नियमानुसार कर्जाची परतफेड केली, तरी अॅपवाल्यांकडून धमकावून खंडणी उकळली जाते आहे. जर एखाद्याने पैसे नाही दिले, तर त्यांना शिव्यांची लाखोली वाहण्यापासून ते फोटो अश्लील पद्धतीने मॉर्फ करून नातेवाइकांना पाठवून बदनामी करण्यापर्यंत प्रकार होत आहेत.
गंभीर म्हणजे दिवसेंदिवस असे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढीस लागले आहेत. काही प्रकरणांत तर कर्ज घेतले नसतानादेखील पैसे भरण्यासाठी तगादा लावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ही कर्ज देणारी ॲप कोठेच नोंदणीकृत नसतात, ना त्यांना सेबीचा नियम असतो. त्यामुळे त्यांच्यावर अंकुश ठेवता येत नसल्याचे सायबर पोलिस सांगतात. नागरिकांच्या गरजेचा फायदा घेऊन त्यांच्याकडून केवळ पैसे उकळण्यासाठीच हे अॅप सक्रिय असल्याचे दिसून येते. गुगलने असे दोनशे पेक्षा अधिक अॅप ‘बॅन’ केले आहेत. सायबर गुन्हेगारीतील सर्वांत वेगाने वाढणारा हा गुन्ह्यांचा ट्रेंड आहे.