ताजी बातमी ऑनलाईन टीम
वर्ल्ड मेन्सट्रुअल हाइजीन डे’ म्हणजेच ‘जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस’ (World Menstrual Hygiene Day 2022) या दिवसी महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) राज्यातील महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. दारिद्र्यरेषेखालील महिला तसेच बचत गटाच्या महिलांसाठी 1 रुपयांमध्ये 10 सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील 60 लाख महिलांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा होणार आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापूरात (kolhapur) याबाबत घोषणा केली. राज्य सरकारच्या या निर्णयाचे सर्व महिला वर्गाकडून स्वागत केले जात आहे.
राज्य सरकारची ही योजना 15 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा खूप फायदा होणार आहे. हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, ‘मासिक पाळी हा महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि जागतिक प्रश्न आहे. गेल्या वर्षात मासिक पाळीच्या वेळी काळजी न घेतल्याने जगभरातील आठ लाख महिलांचा मृत्यू झाला आहे. स्त्रियांच्या होणाऱ्या मृत्यू मागे हे सर्वात मोठे कारण असून हा प्रश्न कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील दारिद्र रेषेखालील महिलांसाठी नाममात्र रुपयांमध्ये ग्रामविकास खात्याकडून ही नवीन योजना राबवण्यात येणार आहे.’
दारिद्र रेषेखालील 19 वर्षावरील सर्व महिलांसाठी ही योजना असणार आहे. सध्या महाराष्ट्रात राज्यात आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेत फक्त 19 वर्षाखालील युवतींना सहा रुपयात सहा नॅपकिन्स असलेले कीट पुरवण्यात येतात. त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही. म्हणून हा प्रश्न सोडवण्यासाठी ग्राम विकास विभागामार्फत दारिद्र्य रेषेखालील सर्व युवती आणि महिलांना या समस्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना आणि बचत गटांमधील महिलांना एक रुपये नाममात्र किमतीमध्ये सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेची सुरुवात 15 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.