विनापरवाना तसेच खासगी जागेत जाहिरात फलक शुल्क न भरता उभारलेल्या डिजिटल फलकांविरोधात महानगरपालिकेने गुरुवारी जोरदार मोहीम राबविली. सांगली व मिरजेत विनापरवाना 263 फलक जप्त केले. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने कारवाई मोहीम सुरू आहे.
महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावर जाहिरातीचे अनेक फलक विनापरवाना उभारले जात आहेत. राजकीय पक्ष, संघटना यांचे बॅनर, झेंडे अन्य फलक, जाहिरात कंपन्यांचे फलक तसेच अनेक व्यावसायिक, दुकानदार यांनी आपल्या व्यवसायाच्या दर्शनी बाजूस महापालिकेच्या परवानगीविना आणि कोणतेही जाहिरात शुल्क न भरता जाहिरात फलक उभारले आहेत. या विनापरवाना फलकांच्या गर्दीमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे, अशा फलकावर कारवाई करावी, फौजदारी दाखल करावी, असे आदेश आयुक्त कापडणीस यांनी मालमत्ता विभागासह सहायक आयुक्तांना दिले आहेत.
गुरुवार सकाळपासून सांगलीत सहायक आयुक्त नितीन शिंदे, मिरजेत सहायक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांच्या पथकाने विनापरवाना व जाहिरात शुल्क न भरता उभारलेले जाहिरात फलकांविरोधात मोहीम सुरू केली. सांगलीत 43 व मिरजेत 220 फलक जप्त केले. जाहिरात शुल्क महापालिकेकडे भरावे, अन्यथा कारवाई केली जाईल, इशारा देण्यात आला.