5G सेवेसाठी आतुरतेने वाट पाहणाऱ्या टेलिकॉम कंपन्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने (Central Government) दूरसंचार सेवांसाठी 5G स्पेक्ट्रम लिलावाला अखेर मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयासोबतच या टेलिकॉम स्पेक्ट्रमसाठी अॅडव्हान्स पेमेंट भरण्याची अटही रद्द करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, पुढच्या आठवड्यात दूरसंचार विभाग लिलावासाठी अर्ज मागवण्यास सुरुवात करणार आहे.
दूरसंचार कंपन्यांकडून 5G स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून करण्यात येत होती. अखेर केंद्र सरकारने त्यांची ही मागणी मान्य केली असून 5G स्पेक्ट्रम लिलावाला मंजुरी दिली. केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर पुढील महिन्यात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आलेल्या माहितीनुसार, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने स्पेक्ट्रम लिलाव आयोजित करण्याच्या दूरसंचार विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. स्पेक्ट्रम लिलावाला यशस्वी बोली लावणाऱ्यांना सार्वजनिक आणि उद्योगांना 5G सेवा प्रदान करण्यासाठी नियुक्त केले जाईल.
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ‘लिलावात स्पेक्ट्रमची एकूण किंमत 5 लाख कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. लिलावात यशस्वी बोली लावणाऱ्या कंपनीला 20 आठवड्यांमध्ये रक्कम भरण्याचा अवधी दिला जाईल. जुलै अखेरपर्यंत हा लिलाव होणार आहे. संबंधित लिलाव हा 20 वर्षांच्या वैधतेसह एकूण 72097.85 मेगाहट्झ स्पेक्ट्रमसाठी असतील.’ तसंच, या लिलावाअंतर्गत 600, 700, 800, 1,800, 2,100, 2,300 आणि 2,500 MHz बँडचा लिलाव होणार आहे. या लिलावासाठी स्पेक्ट्रमची एकूण किंमत 5 लाख कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.