शिक्षकांच्या बदल्यांसाठी सर्वसाधारण क्षेत्र व अवघड क्षेत्र निश्चित करण्यासाठी सन 2019 मध्ये करण्यात आलेली यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार अवघड क्षेत्रातील (दुर्गम) गावांची संख्या 155 इतकी निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, यावर्षी साधारणपणे 1500 शिक्षकांच्या बदल्या होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेत शिक्षक बदलीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शिक्षकांची माहिती पोर्टलवर भरण्यात येऊ लागली आहे. माहिती भरण्याची अंतिम मुदत दि. 20 जूनपर्यंत आहे. जे शिक्षक आपली माहिती पोर्टलवर भरणार नाही त्यांची माहिती गटशिक्षणाधिकाऱ्यांना भरण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गटशिक्षणाधिकाऱ्यांनी भरलेल्या माहितीबाबत मात्र संबंधित शिक्षकांना कोणतीही तक्रार करता येणार नाही. या बदल्यांसाठी अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्रातील गावे निश्चित करून ती पोर्टलवर भरण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांना देण्यात आल्या होत्या.
जिल्हा परिषदेने सन 2019 मध्ये अवघड क्षेत्रातील गावांची यादी तयार केली होती. परंतु कोरोनामुळे बदल्या होऊ शकल्या नाहीत. गेल्यावर्षी शिक्षक बदल्यांची चर्चा सुरू झाल्यानंतर जिल्हा परिषदेने पुन्हा 2021 मध्येही अवघड व सर्वसाधारण क्षेत्रातील गावांची यादी निश्चित केली होती. यात साधारणपणे सव्वाशे गावांचा समावेश होता. परंतु 2019 मध्ये केलेली अवघड व सर्वसाधारण क्षेत्रातील गावांची यादी ग्राह्य धरण्याबाबत शासनाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार अवघड क्षेत्रातील 155 गावे निश्चित करण्यात आली असून ही माहिती पोर्टलवर भरण्यात आली आहे.