राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून आणणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या नव्या सरकारची आज खरी कसोटी लागणार आहे. शिंदे सरकारला बहुमत चाचणीला (Maharashtra Floor Test) समोरे जावे लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आज 288 सदस्यीय विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला (Maharashtra Floor Test Update) सामोरे जावे लागणार आहे. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर (Maharashtra Politics) शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 30 जून रोजी सत्ता हाती घेतली होती. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
दरम्यान दोन दिवसीय विषेश अधिवेशनात रविवारी भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. सभापतीपदाच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांना 164, तर शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांना 107 मते मिळाली. त्यानंतर आता शिंदे सरकारला आज सभागृहात आपले बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.
शिवसेनेच्या दोन्ही गटांचे वेगवेगळे व्हिप
सभापती निवडीदरम्यान एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील दोन गटांमध्ये सुरू असलेल्या संघर्षात दोन्ही पक्षांनी सर्व आमदारांना आपापल्या उमेदवारांच्या बाजूने मतदान करण्यासाठी स्वतंत्र व्हिप जारी केले होते. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने भारतीय जनता पक्षाचे नेते राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षपदाच्या बाजूने मतदान केले, तर ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटातील 16 आमदारांनी त्यांच्या विरोधात मतदान केले. ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने नंतर उपसभापती नरहरी झिरवाल यांना पत्र सादर केले आणि दावा केला की काही आमदारांनी पक्षाच्या सूचनांचे उल्लंघन केले आहे.
मध्यावधी निवडणुकीसाठी सज्ज व्हा- शरद पवार
एकीकडे शिंदे सरकार बहुमत चाचणीची तयारी करत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असल्याचे वक्तव्य केले आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार येत्या सहा महिन्यांत पडू शकते असा अंदाज पवार यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार आणि नेत्यांना संबोधित करताना पवार यांनी पक्षाला निवडणुकांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकीला उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने ही माहिती दिली आहे.