विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्फूर्ती चौकात सुरू असलेल्या ऑनलाईन जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकला. जुगाराचा हा अड्डा चालविणाऱ्या कवलापूर (ता. मिरज) येथील रघुनाथ सदाशिव साळुखे (वय 26) याला अटक करण्यात आली आहे.
छाप्यात एलसीडी मॉनिटर, सीपीयू, किबोर्ड व साडेचारशे रुपयांची रोकड असा 1 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई दीपक गट्टे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
स्फूर्ती चौकातील लक्ष्मी अपार्टमेंटसमोरील एका गाळ्यात ऑनलाईन जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या पथकाने छापा टाकला. छाप्याची चाहूल लागताच जुगार खेळण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी पलायन केले. रघुनाथ साळुखे याला पकडण्यात आले.