राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने (Rain) दांडी मारली आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतली. मात्र काही ठिकाणी, हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडतोय. मुंबईतील (Mumbai) काही परिसरांमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मात्र काही ठिकाणी पावसाने उघढीप दिली आहे. दरम्यान, येत्या चार ते पाच दिवसात महाराष्ट्रात पावसाचा (Maharashtra) जोर कमी असण्याची शक्यता असून, हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर 1 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.
येत्या दोन-तीन दिवसात मुसळधार पावसाचा इशारा
27 ते 30 ऑगस्टदरम्यान काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यासाठी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला गेला आहे. विदर्भामध्ये तर विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने पावसाविषयी हा अलर्ट जारी केला आहे.
परतीचा पाऊस सप्टेंबरपासून
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये नैऋत्य मान्सून परतीकडे टप्प्यात प्रवेश करणार आहे. हे जवळपास सामान्य तारखांपेक्षा 15 दिवस आधी आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून गुरुवारी ही माहिती देण्यात आली आहे. नैऋत्य मान्सून परतीची तारीख हे साधारणतः 17 सप्टेंबर असते. तर नैऋत्य मान्सूनची वास्तविक परतीचा प्रवास हा सामान्यतः एकतर आधी किंवा नंतर होतो असे हवामान विभागाकडून सांगण्यात आली आहे. तसेच IMD ने गुरुवारी जारी केलेल्या अंदाजात म्हटले आहे की, वायव्य भारतातील काही भागांमधून नैऋत्य मान्सून 1 सप्टेंबरपासून माघार घेण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. देशामध्ये मान्सूनचा पाऊस यावेळी नऊ टक्के जास्त आहे. मात्र असे असले तरी उत्तर प्रदेश, बिहार आणि मणिपूर सारख्या राज्यांमध्ये दीर्घ सरासरीपेक्षा 40% कमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे येथील शेतकरी चिंतेत आहेत.
राज्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद
जून महिन्यापासून ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. जून आणि जुलै महिन्यात मराठवाड्यासह विदर्भात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. याचा परिणाम अनेक नद्यांना पूर आला. धरणांच्या पाणीपातळीतही वाढ झाली होती. यासोबतच अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळं आता पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.