Monday, August 4, 2025
HomeसांगलीSangli : परतीच्या पावसाचा जिल्हय़ाला दणका; वीज पडल्याने तरूण ठार

Sangli : परतीच्या पावसाचा जिल्हय़ाला दणका; वीज पडल्याने तरूण ठार

परतीच्या पावसाने जिल्हय़ाला जोरदार दणका दिला आहे. मुसळधार पावसाने अनेक ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. तर कवठेमहांकाळ तालुक्यातील घोरपडी येथे मंगळवारी दुपारी अंगावर वीज पडून तरूण शेतकरी ठार झाला. मिरज तालुक्यातील दुधगाव येथे ढगफुटी झाल्याने सुमारे दोनशे घरांत पाणी शिरले. सोमवारपासून सुरू झालेल्या पावसाने मंगळवारी दिवसभर डोळा उघडला नाही. त्यामुळे द्राक्षबागायतदार शेतकरी हबकला आहे. द्राक्षावर डाऊनी, घडकुजव्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असून शेकडो हेक्टरवरील फळ छाटण्या थांबल्या आहेत. सोयाबीनसह अन्य पिकांनाही या पावसाचा मोठा दणका बसला आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यातील घोरपडी येथील तरूण बापूराव अर्जुन नरळे वय 35 हे शेतातून मोटार सायकलवरून घरी जात असताना अंगावर वीज पडून ठार झाले. बापूराव नरळे यांच्या शेतात भुईमूग काढणीचे काम सुरू असल्याने ते शेताकडे गेले होते. परंतु पाऊस सुरू झाल्याने ते मोटरसायकलवरून घरी जात असतानाच अंगावर वीज पडून ते जागीच ठार झाले.

दुधगावमध्ये ढगफुटी सदृश पाऊस

मिरज तालुक्यातील दुधगांव परिसरात ढगफुटी सदृश पावसाने तुफान झोडपले. ढगांच्या गडगडाटासह अचानक आलेल्या पावसाने दोनशेहून अधिक घरात पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. दुधगाव-बागणी, तसेच कवठेपिरान रस्त्यावरील ओढय़ाला पाणी आल्याने वाहतूक खोळंबली होती. मिरज तालुक्यासह तासगाव, वाळवा तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. पावसाने काढणीला आलेल्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले.

गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे द्राक्षांवर डाऊनी रोगाचा फैलाव झाला आहे. गेल्या दोन दिवसापासून वातावरणात बदल होवून पुन्हा परतीचा पाऊस बरसू लागला आहे. बहुतांशी भागात ढगाळ वातावरण होते, अधून-मधून जोरदार पाऊसही पडत राहिला. जत, कवठेमहांकाळ, तासगाव, आटपाडी तालुक्यात दोन दिवसानंतर पडलेल्या दमदार पावसानंतर पश्चिम भागात मंगळवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. दुधगाव येथे पहाटे पाचपासून ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.

तब्बल चार पावसाने झोडपून काढले. पावसाने झोडपून काढले. पावसाचा जोर वाढतच राहिल्याने दोनशेहून अधिक घरात पाणी शिरले. मराठी मुलांची शाळा परिसर सावर्डे गल्ली, कुंभार गल्ली, म्हेत्रे गल्ली, स्टैंड परिसरातील बहुतांशी घरांमध्ये पाणी शिरले. कर्मवीर पुतळ्यालाही पाण्याने वेढा घातला. किराणा दुकान, पानपट्टी, पिठाची गिरणीमध्ये पाणी शिरल्याने भल्या पहाटेच नागरिकांची तारांबळ उडाली. बागणी-दुधगाव, कवठेपिरान ओढे भरुन वाहत होते. त्यामुळे ओढय़ांना पुराचे स्वरुप आले होते, काही काळ बागणी रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती.

द्राक्षबागांना फटका

गेल्या दोन तीन वर्षापासून द्राक्षबागायतदार शेतकरयांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसला आहे. आधीची दोन वर्षे कोरोनामुळे द्राक्षे गेली. तरीही न डगमगता शेतकरयांनी पुन्हा नव्या जोमाने यावर्षी छाटण्या केल्या. आता काही भागातील बागांमध्ये घड येऊ लागले आहेत. तर काही ठिकाणी फ्लॉवरींगच्या टप्प्यात बागा आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला सलग पाऊस आणि दमट हवामान यामुळे या बागांवर डाऊनी आणि कुजव्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने बागांचे शंभर टक्के नुकसान होण्याची भिती आहे.

त्यामुळे यावर्षीही शेतकरी अडचणीत आला आहे. प्रशासनाने नुकसान झालेल्या बागांचे पंचनामे करण्याची मागणी होऊ लागर्ल – सोयाबीन पिकालाही मोठा फटका बसला असून अद्याप 50 टक्क्याहन अधिक पीक शेतात आहे. येत्या आठ ते दहा दिवसात सोयाबीन काढणीला आले आहे. सलग पावसाने सोयाबीन शेंगावर करपा आणि शेतातच सोयाबीन उगवण्याची भिती निर्माण झाली आहे.

शिवाय हळद, खरीप ज्वारी, भुईमूग, सुर्यफूल पिकांनाही फटका बसला आहे. हळदीवर कंद कुज आणि पाने पिवळी पडणे, करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढला असल्याची माहिती डिग्रज येथील शेती शाळेतील शास्त्रज्ञ डॉ. सचिन महाजन यांनी दिली. या हवामानामुळे ऊसाची वाढही दोन ते तीन कांडय़ांनी घटली असल्याचे डॉ. महाजन यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -