Tuesday, July 29, 2025
Homeराजकीय घडामोडीअंधेरीचा पहिला झटका … मशाल पेटली; सामनातून भाजपवर टीकेचा बाण

अंधेरीचा पहिला झटका … मशाल पेटली; सामनातून भाजपवर टीकेचा बाण

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने अखेरच्या क्षणी आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतल्यानंतर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाजप आणि शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. अंधेरीचा पहिला झटका …. मशाल पेटली या मथळ्याखाली सामनातून टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत. अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ‘मशाली’चा पहिला चटका महाराष्ट्राच्या दुष्मनांना बसला आहे. पुढे पुढे पहा. आणखी बरेच पोळायचे आणि भाजायचे बाकी आहे असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे.

आधी एक ना अनेक कारस्थाने व नंतर बराच ऊहापोह केल्यावर भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी आता अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी श्री. शरद पवारांपासून राज ठाकरे यांनी फडणवीसांना विनम्र आवाहन केले व शेवटी भाजप नेत्यांनी म्हणे दिल्लीशी चर्चा करून अंधेरीतील उमेदवार मागे घेतला. अर्थात भाजपचे माघारी नाट्य हे दिसते तसे सरळ नाही. पराभव झाला तर सरकारला मोठी किंमत चुकवावी लागेल हे त्यांच्या लक्षात आले असावे आणि शिवसेनेची मशाल जिंकणारच आहे याची खात्री भाजपला पटली असावी. शिवसेनेची ही ‘भडकलेली मशाल’ बेइमानींचे इमले जाळून टाकेल. त्यापेक्षा आता माघार घ्यावी हेच बरे, हा सुज्ञ विचार भाजप व मिथे सरकारने केलेला दिसतो.

दुसरे म्हणजे भाजप उमेदवाराच्या उमेदवारी अर्जात अनेक गफलती समोर आल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद होण्याचा धोका होता. या धोकादायक वळणावर भाजप आणि मिंधे गटाच्या गाडीस अपघात होणारच होता. त्या धोक्यातून सुटका करून घ्यायची म्हणून अचानक गाडीस ब्रेक मारून भाजपने ‘यू टर्न’ घेतला. तरी या निर्णयाबद्दल आम्ही संबंधितांचे आभार मानीत आहोत. मशालीची सुरुवात चांगलीच झाली.

अंधेरीतील याच मशालीचा प्रकाश आता संपूर्ण राज्याला उरकून टाकेल. शिवसेना हा अस्सल मराठी बाण्याचा प्रखर हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि हिंदुत्वात पवित्र अग्निदेवतेचे विशेष स्थान आहे, यज्ञ, होमकुंडातील धगधगत्या अग्नीत समिधांची आहुती देऊन धर्मावरील, समाजावरील संकट दूर केले जाते. अंधेरीत तेच घडले.

शिवसेनेच्या विजयी मशालीने या पोटनिवडणुकीतील संकटे व अमंगलाचा नाश केला, भाजप कारस्थानी आनंदीबाई माफ करा, कमळाबाईनी बेइमान ‘मिधे’ गटास हाताशी पकडून जो घात शिवसेनेवर, पर्यायाने महाराष्ट्रावर घातला, त्यास चोख प्रत्युत्तर देण्यासाठी नियतीनेच जणू अंधेरी पोटनिवडणुकीचे प्रयोजन केले होते. आधी पेटीत बेटकुळया फुगवून शत्रू ठोकणाऱ्यांना कुस्तीआधीच मशालीची धग आणि चटके बसले व त्यांनी कुस्ती न खेळताच मैदान सोडले असं सामनातून म्हंटल आहे.

शिवसेनेचे कडवट तसेच निष्ठावान आमदार रमेश लटके यांचे अकाली निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणूक लागली होती. शाखाप्रमुख, नगरसेवक आणि विधानसभेपर्यंत पोहोचलेला हा तरुण शिवसैनिक, अनेक आंदोलनात रमेश लटके यांनी पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाल्ल्या, संघर्ष केला. लोकसेवेसाठी ते आयुष्यभर झिजले, ते असे अचानक आमच्यातून निघून जातील असे वाटले नव्हते; पण आमचे निष्ठावान, सतत हसतमुख रमेश लटके गेले हासुद्धा एक धक्काच होता.

स्वर्गीय रमेश लटके यांच्या सुविद्य पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. खरे म्हणजे अशा दुखद प्रसंगी राजकीय भेदाभेद विसरून, सगळयांनी एकत्र येऊन आधीच ही पोटनिवडणूक बिनविरोध करायला हरकत नव्हती, पण बिनविरोध करायचे राहिले बाजूला, ऋतुजा लटके यांच्या मार्गात अडथळे निर्माण करण्यासाठी भाजप व मिथे गटाची अभद्र हातमिळवणी झाली. मुंबई महापालिकेत नोकरी करणाऱ्या श्रीमती लटके यांचा नोकरीचा राजीनामा स्वीकारला जाऊ नये व त्यांना निवडणूक लढवता येऊ नये यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणे जिवाची बाजी लावली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -