Thursday, July 24, 2025
Homeकोल्हापूरKolhapur Rain: परतीच्या पावसाचा तडाखा, कोल्हापुरात ढगफुटीसदृश्य पाऊस

Kolhapur Rain: परतीच्या पावसाचा तडाखा, कोल्हापुरात ढगफुटीसदृश्य पाऊस

वीजांच्या कडकडाटासह शहर आणि परिसरात सोमवारी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. सुमारे तासभर झालेल्या या पावसाने शहरात दाणदाण उडाली. यामुळे संपूर्ण शहर जलमय होऊन वाहतूक कोलमडली. फेरीवाल्यांसह नागरिकांचीही तारांबळ उडाली. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील नारळाच्या झाडावर वीज कोसळली मात्र सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. दरम्यान, जिल्ह्यांच्या अनेक भागातही पावसाने झोडपून काढले.

सकाळी ढगाळ वातावरण,दुपारी चार वाजेपर्यंत ऊन आणि सायंकाळी जोरदार पाऊस असे वातावरण सोमवारी शहरवासियांना अनुभवायला मिळाले. गेल्या पंधरा दिवसापासून जिल्ह्याला पावसाचा जोरदार तडाखा बसत आहे. हवामान विभागाने 15 ऑक्टोबरपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होईल अशी शक्यता व्यक्त केली होती.

त्याप्रमाणे 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी पावसाने पूर्ण उसंत दिली. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र सोमवारी पुन्हा मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. ढगफुटीसदृश्य पावसाने कोल्हापूरकरांची तारांबळ उडवली. सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास पूर्वेकडून ढग दाटून येऊन मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसाने काही मिनिटातच रस्त्यावरुन पाण्याचे लोट वाहून रस्त्यांना ओढ्याचे तर मैदानांना तळ्याचे स्वरुप आले.

मेरी वेदर मैदानासमोरील रस्त्यावर गुडघ्याइतके पाणी साचल्याने येथून मार्ग काढताना वाहनधारकांची दमछाक झाली. सखल भागात पाणी साचून वाहतूक व्यवस्था कोलमडली. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरु होती.

फेरीवाल्यांची तारांबळ

दिवाळी सण आठ दिवसावर आला आहे. यामुळे साहित्य
खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी होत आहे. महाद्वार रोडसह लक्ष्मीपुरी, राजारामपुरीत फेरीवाले रस्त्यावर व्यवसाय करत आहेत. पण पावसामुळे त्यांच्या व्यवसायावर पाणी फेरले जात आहे. सोमवारी सायंकाळी आलेल्या पावसानेही फेरीवाल्यांची निराशा केली.

ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस

परतीचा पाऊस थांबायचे नाव घेत नसल्याने ऑक्टोबर महिना जिल्ह्यातील पिकासाठी हानीकारक ठरला आहे. जिल्ह्यात ज्या ठिकाणी पाऊस कमी होणे अपेक्षित आहे, तिथे ऑक्टोबर महिन्यात 129.2 मिमी पाऊस झाला असून ऑक्टोबर महिन्याच्या सरासरीच्या दुप्पट आहे.

पावसाने खड्डे मोठे

शहरातील बहुतांश रस्त्यावर खड्डे पडले आहेत. खड्डेमय रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तर वाहनांचे नुकसान होत आहे. महापालिकेने शहरातील खडे अजून मुजवले नाहीत. तोपर्यंत पाऊस सुरुच असल्याने खडे आणखी मोठे होत आहेत.

फेरीवाल्यांच्या डोळ्यात पाणी

दोन वर्षे कोरोनात गेली. सुदैवाने यंदा कोणतेही विघ्न नसल्याने व्यवसाय चांगला होण्याच्या अपेक्षेतील फेरीवाल्यांच्या डोळयात पावसाने पाणी आणले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -