ताजी बातमी ऑनलाईन टीम
सांगली : हर हर महादेव या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आल्याचा आरोप करीत चित्रपटाचा निर्माता सुनिल फडतरे यांच्या सांगलीतील घरासमोर मावळा युवा महासंघाने आंदोलन केले. संस्थापक अध्यक्ष रुपाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलकांनी व शिवप्रेमींनी ही निदर्शने आणि घोषणाबाजी केली.
हर हर महादेव या चित्रपटात अतिशय खालच्या पातळीवर इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले आहे. याचा निषेध करत चित्रपटाचा निर्माता सुनिल फडतरे यांच्या घरासमोर शनिवारी सकाळी आंदोलन करण्यात आले. यावेळी इतिहासाचे विकृतीकरण करून त्याची मांडणी करणाऱ्या निर्माते फडतरे यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच हर हर महादेव या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतचा जो इतिहास दाखवण्यात आला आहे तो चुकीचा आणि अवमान करणारा आहे. त्यामुळे निर्मात्यांनी तातडीने जो सत्य इतिहास आहे तो दाखवावा आणि चुकीचा इतिहास तातडीने चित्रपटातून वगळावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी कविता पुणेकर, पौर्णिमा पाटील, प्रशांत भोसले, चंद्रशेखर पाटील, पै. अमित पवार, रोहित पवार, राजेंद्र पाटील व इतर शिवप्रेमी उपस्थित होते.