ताजी बातमी ऑनलाईन टीम
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि त्याच्या टीमला शुक्रवारी रात्री उशिरा कस्टम विभागाने मुंबई विमानतळावर रोखले. सुमारे तासाभराच्या चौकशीनंतर शाहरुख खान आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी विमानतळावरून बाहेर पडताना दिसले, पण किंग खानचा बॉडीगार्ड रवी आणि टीमला कस्टमने पकडले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लाखो रुपयांची घड्याळे भारतात आणणे, त्याच्या बॅगेत महागड्या घड्याळांचे रिकामे बॉक्स सापडणे आणि कस्टम ड्युटी न भरल्याबद्दल शाहरुख खानची चौकशी करण्यात आली.
लाखोंची घड्याळं सापडली
शाहरुख खान खासगी चार्टर्ड विमानाने मुंबईत पोहोचला. शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास शाहरुख खान आणि त्याची टीम टी-3 टर्मिनल येथे रेड चॅनल पार करत असताना कस्टम्सने अडवले. त्याच्या बॅगेत Babun & Zurbk , रोलेक्स घड्याळाचे 6 बॉक्स, स्पिरिट ब्रँडचे घड्याळ, अॅपल सिरीजची घड्याळे आढळून आली. यासोबत घड्याळांचे रिकामे बॉक्सही सापडले.
कस्टम्सने या घड्याळांचे इव्हॅल्यूएशन केले, त्यानंतर त्याच्यावर 17 लाख 56 हजार 500 रुपये कस्टम ड्युटी लावण्यात आली. यानंतर कोट्यवधी रुपयांच्या या घड्याळांवर लाखो रुपयांचा कर भरावा, असे सांगण्यात आले. तासाभराच्या प्रक्रियेनंतर शाहरुख आणि पूजा ददलानी यांना विमानतळाबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली मात्र शाहरुख खानचा बॉडीगार्ड रवी आणि टीममधील सदस्यांना येथेच थांबवण्यात आले.