पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या (Pune Crime) घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. शुल्लक कारणांवरुन वाद होऊन हत्या करण्यात आल्याच्या अनेक घटना पुण्यामध्ये वारंवार समोर येत आहेत. अशामध्ये आणखी एक अशीच घटना पिंपरी चिंडवडमध्ये (Pimpari-Chinchwad) घडली आहे. शुल्लक कराणावरुन वेटरची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मटणाच्या रस्स्यावरुन झालेल्या वादात एका वेटरला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वेटरचा मृत्यू (Waiter Murder Case) झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील पिंपळे सौदागर भागात असलेल्या सासुरवाडी खाणावळमध्ये ही घटना घडली आहे. या खाणावळमध्ये काम करणाऱ्या मंगेश संजय पोस्ते या वेटरची हत्या करण्यात आली आहे. या खाणावळमध्ये आरोपी विजयराज वाघीरे आणि त्याचा मित्र जेवणासाठी आला होता. हॉटेलमध्ये देण्यात येणाऱ्या सर्व्हिसवरुन विजयराज आणि हॉटेलचा वेटर मंगेश पोस्ते यांच्यात वाद झाला. मटणाच्या रस्स्यामध्ये भात का दिला? अशी विचारणा करत तुमच्या खाणावळीची सर्व्हिस चांगली नाही असे म्हणत आरोपी विजयराजने गोंधळ घातला.
विजयराज ऐवढ्यावर न थांबता त्याने थेट हॉटेलच्या बाहेर जाऊन लाकडी दांडक्याने सासुरवाडी खाणावळमध्ये काम करणाऱ्या मंगेशसह इतर वेटर्सला मारहाण करण्यास सरुवात केली. आरोपीने वेटर मंगेश पोस्तेला बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या मंगेशचा जागीच मृत्यू झाला. तर अमित अमृत मुठकुळे आणि सचिन सुभाष भवर हे दोन वेटर देखील जखमी झाले आहेत.
मंगेशची हत्या केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. खाणावळ बाहेर असलेल्या सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे. या हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी विजयराज वाघीरे आणि त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.