कोल्हापुरात आल्यानंतर स्वच्छतागृहांची वाणवा असल्याने महिलांची होत असलेली कुचंबणा काही प्रमाणात का असेना आता थांबणार आहे.शहरात पाच ठिकाणी पाच स्वच्छतागृहांची कामे सुरु करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर महानगरपालिकेने दिली आहे. अन्य सहा ठिकाणी सुद्धा स्वच्छतागृहे प्रस्तावित असली, तरी नागरिकांकडून होत असलेल्या विरोधाने काम थांबवण्यात आलं आहे. स्वच्छतागृह नसल्याने अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिलांची चांगलीच कुचंबणा होत आहे. एबीपी माझाने याबाबत वृत्तही प्रसिद्ध केले होते. अंबाबाई मंदिर परिसरातील स्वच्छतागृहाचे काम स्थानिक विरोधामुळे स्थगित करण्यात आले आहे.
दरम्यान, मनपाच्यामहिला व बाल कल्याण विभागाच्या निधीतून केशवराव भोसले नाट्यगृह, गांधी मैदान विभागीय कार्यालय, केएमसी कॉलेज, मध्यवर्ती बसस्थानक, ताराबाई उद्यान या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहाची कामे सुरू करण्यात आली आहेत. महिला बालकल्याण विभागाकडून गर्दीची ठिकाणे, बाजारपेठ, भाजी मंडई, बसथांबे या ठिकाणी वॉश बेसिनसह दोन युनिटची स्वच्छतागृहे प्रस्तावित करण्यात आली होती.
यल्लमा मंदिर ओढा, शाहू खासबाग मैदान, रंकाळा रोड, जयप्रकाश नारायण उद्यान, रंकाळा चौपाटी, रंकाळा पदपथ, टाऊन हॉल बसस्टॉप, बिंदू चौक पार्किंग, मेरी वेदर ग्राऊंड, राज कपूर पुतळा बाग, जनता बाजार चौक येथे महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्यात आली आहेत. त्याचा वापर सुरू आहे. दुसरीकडे, राजाराम चौक चॅनेल जवळ, टिंबर मार्केट भाजी मंडई जवळ, साकोली कॉर्नर रोड चॅनेल, पद्माराजे हायस्कूल मुलींची शाळेच्या चॅनेलला लागून, करवीर वाचन मंदीर मेन राजाराम आतील बाजू या ठिकाणी नियोजन करण्यात आले होते. ठेकेदारांमार्फत काम सुरू करण्यात आले होते. मात्र, स्थानिक व परिसरातील व्यापाऱ्यांचा विरोध होत असल्याने काम पूर्ण करता आले नाही.
महिलांना स्वच्छतागृह शोधण्याची वेळ
नववर्षाचे स्वागत अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होऊन करण्यासाठी तब्बल 1 लाख 71 हजार भाविकांनी भेट दिली होती. यामध्ये महिला भाविकांसह तरुणींचा सुद्धा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. मात्र, स्वच्छतागृहाची वाणवा असल्याने त्यांना गैरसोयींना सामोरे जावं लागत आहे. बाहेरील जिल्ह्यातून तसेच परराज्यातून आलेल्या महिला भाविक याबाबत खंत बोलून दाखवत आहेत. कोल्हापूर शहरात येणाऱ्या महिला भाविकांना अंबाबाई मंदिर, रंकाळा तलाव, भवानी मंडप, चप्पल लाईन, टाऊन हॉल म्युझियम यांसारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळांजवळ सार्वजनिक स्वच्छतागृह, स्वच्छतागृह किंवा स्तनपान करण्यासाठी जागा शोधताना चांगलीच दमछाक होत आहे.