डेंग्यूसह साथ रोगाला कोल्हापुरातून हद्दपार करण्यासाठी नागरिकांच्या सतर्कतेबरोबर शासकीय कार्यालयातील कर्मचारी संख्या आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी आग्रह धरण्याची आवश्यकता आहे. तसे झाले तरच डेंग्यूची हद्दपारी शक्य आहे.
साथरोगाच्या निर्मूलनासाठी महाराष्ट्रात साथरोग प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे. या विभागात आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक आणि आरोग्य पर्यवेक्षक अशा तीन प्रवर्गातून कर्मचारी प्रत्यक्ष कार्यस्थळावर कार्यरत असतात. हा कर्मचारी वर्ग अत्यंत तोकडा आहे.
त्यातही त्यांच्यावर साथरोगाच्या निर्मूलनाऐवजी अन्य जबाबदार्याच अधिक आहेत. कोणी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिनियुक्तीवर काम करतो आहे. कोणी दुसर्याच शासकीय कामासाठी जुंपला गेला आहे, तर कोणाला निवडणुकीची ड्युटी लागते आहे. यामुळे प्रत्यक्ष साथरोगाच्या निर्मूलनासाठी कर्मचारी वर्ग अपुरा पडतो आणि साथीला रान मोकळे मिळते.
काही तालुक्यांना कर्मचारीच नाहीत, म्हणून आमदारांवर राडा करण्याइतपत वेळ आली होती. कोल्हापूर शहरात महापालिकेत तर हे खातेच अस्तित्वात नाही. काही सफाई कामगार हे काम पाहतात. शहराशेजारी 35 हजार लोकसंख्येच्या उचगावात सात कर्मचार्यांची आवश्यकता असताना, तेथे एक कर्मचारी काम करतो आणि त्याच्यावर मुडशिंगीतील साथरोगाच्या प्रतिबंधाची जबाबदारी आहे. मग जिल्ह्याभोवती साथरोगांचा विळखा घट्ट करणार्या डासांचा मुक्काम हलणार कसा?
साथरोगांच्या निर्मूलनासाठी वेळोवेळी औषध फवारणी करणे, डासांचे, पाण्याचे नमुने घेऊन त्याची चाचणी करणे, वेळोवेळी भागामध्ये सर्वेक्षण करून साथरोगांची लक्षणे दिसणार्या रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणे ही कामे अत्यावश्यक आहेत. त्यासाठी कर्मचार्यांची आवश्यकता आहे. हा कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्यासाठी, रिक्त पदे भरण्यासाठी जनतेने लोकप्रतिनिधींच्या मागे रेटा लावला पाहिजे.
कारण, कोल्हापूरचे नागरिक कर(tax) भरतात आणि त्याच्या बदल्यात नागरिकांना साथरोगांचे बक्षीस मिळते आहे. जोपर्यंत जनता यासाठी रेटा लावणार नाही, तोपर्यंत कोल्हापुरातील साथरोगांचे सावट कमी होण्याची शक्यता नाही, हे निर्विवाद सत्य आहे.