यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा हा भारतीयांसाठी खास ठरला आहे. कारण एस.एस राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्यानं बेस्ट ओरिजनल सॉन्ग कॅटेगरीमधील ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. संगीतकार एम एम कीरावानी यांनी स्टेजवर जाऊन हा पुरस्कार स्वीकारला. ‘नाटू नाटू’ गाण्यानं फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार देखील पटकावला होता. आता या गाण्याने ऑस्कर पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे. ही भारतासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात गायक काल भैरव आणि राहुल सिपलीगुंज यांनी यांनी ‘नाटू नाटू’ हे गाणं गायलं. या दोघांच्या परफॉर्मन्सने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांची मनं जिंकली. काल भैरव आणि राहुल सिपलीगुंज यांचा परफॉर्मन्स झाल्यानंतर प्रेक्षकांकडून त्यांना ‘स्टँडिंग ओव्हेशन’ मिळाले. 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील ‘नाटू नाटू’ गाण्याच्या परफॉर्मन्सचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर तसेच आरआरआर चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली, संगीतकार एम एम कीरावानी यांनी ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळ्यासाठी राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी ऑल ब्लॅक लूक केला.
आरआरआर हा 24 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासोबतच आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. नाटू नाटू या गाण्याबरोबरच भारताच्या ‘द एलिफंट विस्परर्स’ या माहितीपटाने देखील ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे. या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला आहे.