शेअर बाजाराने उसळी घेतल्याने जागतिक बाजारपेठेत भारतीय शेअर बाजाराने मांड ठोकली आहे. गेल्या काही दिवसांत दोन्ही प्रमुख भारतीय शेअर बाजारांनी, BSE आणि NSE ने 4-4 ट्रिलियन डॉलरच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. जागतिक बाजाराच्या मार्केट कॅपमध्ये भारतीय बाजाराचा वाटा वाढला आहे. भारतीय बाजार येत्या काही दिवसात उच्चांकी स्तरावर पोहचला आहे. आज बाजाराने तेजीसह सुरुवात केली. सेन्सेक्सने सुरुवातीलाच 72,500 अंकाचा टप्पा ओलांडला. तर निफ्टीने पण 46,000 अंकांचा नारळ फोडला.
जागतिक गुंतवणूकदार आघाडीवर
जागतिक बँकिंग फर्म एचएसबीसीने एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, ग्लोबल मार्केट कॅपमध्ये भारतीय शेअर बाजाराचा वाटा वाढला आहे. भारतीय शेअर बाजार रेकॉर्ड स्तरावर पोहचले आहे. भारताचा वाटा जानेवारी 2024 मध्ये 4 टक्क्यांच्या स्तरावर पोहचले आहे. भारत आता उभरत्या बाजारपेठेत जागतिक गुंतवणूकदारांची पहिली पसंत आहे. याबाबतीत चीनला सुद्धा भारताने मागे टाकले आहे.
भारतीय बाजारामुळे कमाई
या रिपोर्टनुसार, गेल्या 12 महिन्यात भारतीय शेअर बाजाराने इतर शेअर बाजारांच्या तुलनेत जादा कमाई करुन दिली. इतर बलाढ्य बाजारांनी गुंतवणूकदारांना निगेटिव्ह रिटर्न दिला. तर भारतीय शेअर बाजारातून मोठी कमाई झाली. गेल्या एका वर्षात एमएससीआई इंडिया इंडेक्सचा परतावा 28 टक्के तर जागतिक बाजारात एमएससीआई ईएम इंडेक्समध्ये 5 टक्क्यांची घसरण आली.
आता जगातील चौथा मोठा बाजार
यापूर्वी नोव्हेंबर 2023 च्या अखेरीस बीएसई मार्केट कॅप 4 ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडून पुढे गेल्याची बातमी आली होती. आता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात एनएसईचे मार्केट कॅप 4 ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेले आहे. भारतीय बाजाराने केवळ 4-ट्रिलियन डॉलर क्लबमध्ये स्थान बळकट केले असे नाही तर हाँगकॉग शेअर बाजाराला मागे टाकत जगातील चौथा सर्वात मोठा शेअर बाजार झाला आहे.
चीनला भारताचा पर्याय
परदेशी गुंतवणूकदार यापूर्वी चीनला प्राधान्य देत होते. चीनच्या बाजारपेठेत मोठी गुंतवणूक होत होती. पण कोविडनंतर जगाचा आणि गुंतवणूकदारांचा चीनवरील विश्वास डळमळीत झाला आहे. चीनच्या शेअर बाजाराने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान केल्याने, हा वर्ग आता भारतीय शेअर बाजाराकडे वळला आहे. भारताचा बफे इंडिकेटर 129 टक्क्यांवर पोहचला आहे. अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या तुलनेत शेअर बाजाराचे मूल्य किती याचा हे द्योतक मानण्यात येते.