आमदार रोहित पवार यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी महत्वाची माहिती दिली आहे. सततचे दौरे आणि प्रचारसभांमुळे शरद पवार यांना थकवा जाणवत होता. त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत होतं. मात्र, आता सर्व ठिक असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे, असं रोहित पवार यांनी सांगितलं आहे.
गेले २० दिवस साहेब फक्त ४ तास झोपायचे. सततच्या दौऱ्यांमुळे त्यांना थकवा जाणवत होता. आज त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. मात्र, पुढील दोन दिवस डॉक्टरांनी त्यांना भाषण करण्यास मनाई केली आहे, अशी माहिती देखील रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिली आहे.
राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अभूतपूर्व फुटीनंतर ही राज्यातील पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवारांनी (Sharad Pawar) आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.
शरद पवार ठिकठिकाणी दौरे करून वादळी सभा घेत आहेत. दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ रविवारी बारामती येथे शरद पवार यांनी सभा घेतली. मात्र, जेव्हा ते भाषणाला उभे राहिले, तेव्हा त्यांना थकल्यासारखे वाटत होते. बोलतानाही त्यांचा आवाज कातर होत होता.
घसा बसल्याने त्यांचे शब्द देखील नीट फुटत नव्हते. त्यामुळे ते केवळ ४ ते ५ मिनिटेच भाषण करू शकले. दरम्यान, प्रकृतीच्या कारणामुळे शरद पवारांनी आपले सोमवारचे (ता ६) सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. आज ते बीडमध्ये सभा घेणार होते.