Sunday, December 22, 2024
Homeदेश विदेश'नीट' चा गोंधळ : जरा हे समजून घ्या.

‘नीट’ चा गोंधळ : जरा हे समजून घ्या.

चार जूनला लोकसभा निकालाच्या धुमाळीत अचानक नीटचा निकाल घोषित झाला आणि एकच गडबड उडाली. एकीकडे भाजप पास झाला की नापास याची चर्चा रंगत असताना वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी तयारी करणारे विद्यार्थी या खऱ्याखुऱ्या पास नापासच्या काळजीत दंग होते.

 

चार जूनच्या रात्री निकाल लागला पण पाच जूनपासून त्याविषयी वाद सुरू झाले. शंभर टक्के मिळवणारे तब्बल ६७ विद्यार्थी, काही विद्यार्थ्यांचं परीक्षाकेंद्र एकच असणं, त्यांच्या नावात असणारी संशयास्पद गडबड यामुळे नीटविषयीचा संशय अधिकच गडद झाला.

 

राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी (NEET-UG) देशभरातून २४ लाख ६ हजार ७९ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यातील २३ लाख ३३ हजार २९७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

 

परीक्षा होताना कथित पेपरफुटीचं प्रकरण झालं. तर निकाल तब्बल १० दिवस आधी लागला. परीक्षेत ६७ विद्यार्थ्यांना १०० टक्के मिळाले. एकापाठोपाठ बसलेल्या विद्यार्थ्यांना १०० गुण, त्यांची संपूर्ण नावे निकालात नमूद नसणे, त्यांना ग्रेस मार्क्स देणे हा सगळाच प्रकार आता वादाच्या केंद्रस्थानी आला आहे.

 

अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घोळ झाल्याचा आरोप केला असून गेल्या दोन दिवसांपासून यावर एक्सवर हजारो पोस्ट पडत आहेत. त्यामुळेच हा विषय ट्रेंडिंग झालाय.

 

पालकांनीही याविरोधात आवाज उठवला. प्रकरण न्यायालयात गेलं. उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे.

 

दरम्यान या परीक्षेत दिल्या गेलेल्या मार्कांविषयी अनेकांनी आक्षेप घेतला असून विरोधी पक्षाच्या प्रियांका गांधी, कन्हैया कुमार, सचिन पायलट या सगळ्यांनी या सर्व प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

 

जाणून घेऊया या सगळा घटनाक्रम काय आहे?

 

दिनांक : ३ मे २०२४

 

गुजरातमध्ये पेपर फुटल्याचा समाज माध्यमांमधून दावा

 

या वर्षीच्या वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा देशभरात ५ मे रोजी घेण्यात आली. NEET परीक्षेच्या फक्त २ दिवस आधी, एक कथित फसवणूक घोटाळ्याचा एक गंभीर मुद्दा समोर आला. एका शिक्षण संस्थेच्या अधिकाऱ्यांसह गुजरातमधील १६ विद्यार्थ्यांनी NEET परीक्षेत फसवणूक करण्यासाठी प्रत्येकी १० लाख रुपये दिल्याचा आरोप करण्यात आला. या विषयात गुजरातमधील शास्त्रीनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

 

दिनांक : १२ मे २०२४

 

२) नीट पेपरफुटी प्रकरणी बिहारच्या पाटणा पोलिसांकडून १३ जणांना अटक

 

गुन्हा दाखल झाल्यानंतर पाटणा पोलिसांनी १३ जणांना या प्रकरणी अटक केली. ज्यामध्ये काही एमबीबीएसचे विद्यार्थी होते. या प्रकरणी पोलीस तपास चालू असून पेपर फुटला नसल्याचे नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडून सांगण्यात आले. मात्र काही विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार ५.२० ला पेपर संपला पण त्याआधी ४ वाजताच पेपर ऑनलाईन शेअर झाला होता. या पेपर लीक प्रकरणानंतर काही पालक कोर्टात देखील गेले होते. त्यांनी हा पेपरच रद्द करण्याची मागणी केली होती.

 

दिनांक : ४ जून २०२४

 

३)१४ जूनला जाहीर होणार निकाल १० दिवस आधीच जाहीर

 

नीट परीक्षेबाबत जे माहितीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते त्यानुसार नीट परीक्षेचा निकाल हा १४ जून २०२४ रोजी जाहीर केला जाणार होता. मात्र १० दिवस अगोदरच म्हणजे ४ जून रोजी अचानकपणे नीटचा निकाल जाहीर करण्यात आला. याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे की, लोकसभा निवडणुकांचे

 

निकाल ४ जून रोजी जाहीर झाले त्याच दिवशी याही परीक्षेचे निकाल देखील जाहीर करण्यात आले. कारण या निकालातील जो घोळ झाला आहे त्याबाबत माध्यमांमध्ये फारशी चर्चा होऊ नये म्हणून हे जाणीवपूर्वक केल्याचा पालकांचा आरोप आहे.

 

https://exams.nta.ac.in/NEET/images/neet-ug-2024-draft-ib-09022024.pdf

 

दिनांक ४ जून २०२४

 

४) नीटच्या इतिहासात पहिल्यांदाच ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण

 

या परीक्षेत आजपर्यंत दोन किंवा तीन विद्यार्थ्यांना साधारण पैकीच्या पैकी गुण मिळाले होते. मात्र ज्यावेळी ही परीक्षा घेणाऱ्या एजन्सीकडून निकालाच्या दिवशी स्टॅटिस्टिक जाहीर करण्यात आले त्यावेळी चक्क देशातील ६७ विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळल्याची बाब समोर आली. मुख्य म्हणजे या ६७ जणांपैकी ८ विद्यार्थी हे हरियाणाच्या एकाच केंद्रावरील असल्याचे समोर आले आहे. या आठ जणांची संपूर्ण नावे देखील जाहीर करण्यात आलेली नाहीत केवळ यांचे सुरुवातीचे नाव दिसतअसून हे सर्व यादीमध्ये एकखालोखाल एक असल्याचे दिसत आहे, त्यामुळे हे परीक्षेला देखील एकापाठोपाठ एक बसले असल्याची शक्यता पालक आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित केली आहे.

 

दिनांक : ६ जून २०२४

 

५) नीट परीक्षेच्या निकालानंतर राजस्थानच्या कोटा शहरात विद्यार्थिनीची आत्महत्या

 

नीटचा निकाल जाहीर झाल्यानंतर एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने राजस्थान कोटा येथे इमारतीवरून उडी मारून स्वतःला संपविले आहे. या वर्षी जानेवारीपासून देशातील कोचिंग हब, कोटा येथे विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येची ही १० वी घटना आहे. तर २०२३ या वर्षात २६ आत्महत्येची प्रकरणे नोंदवली गेली होती.

 

दिनांक : ६ जून २०२४

 

६) काही विद्यार्थ्यांना उशिरा प्रश्नपत्रिका दिल्या गेल्या म्हणून त्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आल्याचे NTA चे स्पष्टीकरण

 

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ६ जून २०२४ रोजी प्रसिद्धी पत्रक जाहीर करत सांगितले की, विद्यार्थी आणि पालकांच्या तक्रारीनंतरआम्ही काही केंद्रांवरचे CCTV फुटेज देखील पहिले. त्यात आम्हाला असे आढळले की, काही विद्यार्थ्यांना उशिरा प्रश्नपत्रिका देण्यात आली, त्याची नुकसान भरपाई म्हणून आम्ही ज्या विद्यार्थ्यांना जास्तीचे गुण देण्यात आले आहेत.

 

दिनांक : ६ जून २०२४

 

पालकांचा मार्किंग सिस्टिमवर आक्षेप

 

पालकांचा मार्किंग सिस्टिमवर आक्षेप

 

एका व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की, “NEET साठी वापरल्या जाणाऱ्या मार्किंग सिस्टमचा विचार करता NEET मध्ये ७२० पाकी ७१८ किंवा ७२० पैकी ७१९ गुण मिळवणे अशक्य आहे. तरीही या स्कोअरसह या यादीत काही टॉपर आहेत ज्यामुळे शंका उपस्थित होते आहे. तर इंडियन एक्सप्रेसशी बोलताना पालक सुधा शेनॉय म्हणाल्या, एजन्सीने ग्रेस मार्क्सचे धोरण आधीच स्पष्टपणे जाहीर करणे गरजेचे होते. तसेच ज्यांना उशिरा प्रश्नपत्रिका दिल्या गेल्या त्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिले जात नाहीत.

 

नीटची मार्किंग सिस्टीम म्हणजे गुणपद्धती नेमकी आहे तरी काय

 

या परीक्षेत एकूण १८० प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला ४ गुण असतात, असे मिळून परीक्षा ७२० गुणांची असते. तुम्ही प्रश्न सोडवलाच नाहीत तर त्याचे फक्त ४ गुण जातात. पण सोडवूनही एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकलं तर चार मार्कांच्या प्रश्नासाठी तुमचे ५ गुण कापले जातात. यालाच निगेटिव्ह मार्किंग पद्धत म्हटलं जातं. ज्यामुळे नीट परीक्षेत उत्तीर्ण होणं आणि प्राविण्य मिळवणं कठीण असतं.

 

नेमक्या याच पद्धतीमुळे ७२०पैकी ७१७-१९ वगैरे गुण मिळवणं शक्य नाही, असं बऱ्याच पालक-शिक्षक आणि विद्यार्थ्याचं म्हणणं आहे. त्याविषयीचे अनेक व्हिडीओज तुम्हाला समाजमाध्यमांवर दिसतील.

 

दिनांक : ७ जून २०२४

 

८ ) नीटचा वाद कलकत्ता उच्च न्यायालयात

 

कलकत्ता उच्च न्यायालयाने NEET UG 2024 च्या परीक्षेत विविध अनियमिततेचा आरोप करणाऱ्या जनहित याचिकेला उत्तर म्हणून नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ला १० दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती कौशिक चंदा यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने या अर्जाची दखल घेतली आहे.

 

दिनांक ७ जून २०२४

 

९) प्रियंका गांधी, कन्हैया कुमार यांनी केली चौकशीची मागणी

 

काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी या विषयावर ट्विट करत या एकुणातच प्रकारची चौकशी केली जावी अशी मागणी केली आहे. तसेच युवा काँग्रेसने देखील याबाबत पत्रकार परिषद घेत या संपूर्ण प्रकाराबाबत चौकशीची मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -