देशातील सर्व ब्रँड्सच्या मीठ-साखरेत मायक्रोप्लास्टिक्स; रिसर्चमध्ये दावा, आरोग्यवर काय परिणाम?
देशातील सर्व ब्रँड्सच्या मीठ-साखरेत मायक्रोप्लास्टिक्स; रिसर्चमध्ये दावा, आरोग्यवर काय परिणाम?
देशात विकल्या जाणाऱ्या मीठ-साखरेत मायक्रोप्लास्टिक्स- रिसर्च
मीठ आणि साखर हे आपल्या दैनंदिन आहारातील सर्वांत महत्त्वाचे घटक आहेत. दिवसभरात आपण जे काही खाद्यपदार्थ खातो, त्या प्रत्येकात चव आणण्यासाठी साखर किंवा मीठाचा वापर आवर्जून केला जातो. आहारातील हेच सर्वांत महत्त्वाचे घटक आपल्या शरीरातील आजारांचेही स्रोत ठरू शकतात. नुकत्याच एका अभ्यासात मीठ आणि साखरेबद्दलची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अभ्यासानुसार, भारतातील जवळपास सर्व ब्रँडच्या साखर आणि मीठांमध्ये मायक्रोप्लास्टिक्स आढळले आहेत. ‘टॉक्सिक्स लिंक’ या पर्यावरण संशोधन संस्थेनं केलेल्या या महत्त्वपूर्ण अभ्यासात भारतातील प्रत्येक ब्रँडच्या मीठ आणि साखरेची चाचणी करण्यात आली. या प्रत्येक ब्रँडमध्ये मायक्रोप्लास्टिक्स असल्याची चिंताजनक बाब उघड झाली आहे. या संशोधनात मीठाचे दहा विविध प्रकार तपासले गेले. त्यात टेबल, रॉक, सी आणि स्थानिक प्रकारच्या मीठाचा समावेश होता. तसंच ऑनलाइन आणि स्टोअरमधून खरेदी केलेल्या पाच प्रकारच्या साखरेचं परीक्षण करण्यात आलं होतं. या संशोधनाचं निष्कर्ष अगदी स्पष्ट होतं. मीठ आणि साखरेच्या सर्व नमुन्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक आढळले आहेत. यात कोणताही प्रकार किंवा ब्रँड अपवाद ठरला नाही.
अभ्यासात धक्कादायक माहिती उघड
मीठ आणि साखरेत 0.1 ते 5 मिलिमीटर आकाराचे प्लास्टिकचे तंतू, गोळे, प्लास्टिकचा पत्रा, तुकडे यांसह लहान प्लास्टिकचे कण आढळले. विशेष म्हणजे आयोडीनयुक्त मीठ हे सर्वांत दूषित असल्याचं आढळून आलं. प्रति किलोग्रॅम आयोडीनयुक्त मिठात 89.15 मायक्रोप्लास्टिकचे तुकडे आढळले. तर सेंद्रिय रॉक सॉल्टमध्ये सर्वांत कमी 6.70 तुकडे प्रति किलोग्रॅम आढळले.
‘टॉक्सिक्स लिंक’चे संस्थापक-संचालक रवी अग्रवाल यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, “आमच्या अभ्यासाचा मूळ उद्देश हा मायक्रोप्लास्टिक्सवरील आताच्या वैज्ञानिक डेटाबेसमध्ये योगदान देणं हे होतं. जेणेकरून जागतिक प्लास्टिक करार या समस्येचं ठोस आणि योग्य पद्धतीने निराकरण करू शकेल. धोरणात्मक कारवाई सुरू करण्याचं आणि संभाव्य तांत्रिक हस्तक्षेपांकडे संशोधकांचं लक्ष वेधून घेण्याचंही आमचं उद्दिष्ट आहे. यामुळे मायक्रोप्लास्टिक्सच्या संपर्कात येण्याचा धोका कमी होऊ शकतो.”
मायक्रोप्लास्टिक्स म्हणजे काय?
मायक्रोप्लास्टिक्स हे पाच मिलिमीटर ते एक मायक्रोमीटर आकाराचे प्लास्टिकचे छोटे तुकडे असतात. प्लास्टिकच्याच मोठ्या तुकड्यांचं सतत क्षीण झाल्यानंतर त्याचं मायक्रोप्लास्टिकमध्ये रुपांतर होतं. यात दोन प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे जे मूळ मायक्रोप्लास्टिकच्या रुपातच असते आणि दुसरा प्रकार म्हणजे मोठ्या प्लास्टिकचं हळूहळू मायक्रोप्लास्टिकमध्ये रुपांतर होतं. मायक्रोप्लास्टिनप्लास्टिक हे त्याहून लहान असतात. त्यांचा आकार 1000 नॅनोमीटर ते एक नॅनोमीटपर्यंत असतं. आकारामुळे ते मायक्रोप्लास्टिकच्या तुलनेत कमी समजले जातात. यामुळेच ते अधिक धोका निर्माण करतात. मायक्रो आणि नॅनो प्लास्टिक्सना एकत्रितपणे MNP असं संबोधलं जातं.
MNP कुठे आढळतात?
एमएनपी (MNP) हे आज जगाच्या कानाकोपऱ्यात आढळतात. महासागराच्या तळाशी, माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर, ध्रुवीय बर्फाच्या आत, महासागरांमध्ये, माती आणि वनस्पतींमध्ये, सर्व सागरी, सस्तन प्राणी आणि पक्ष्यांच्या, मानवी शरीराच्या आत एमएनपी आढळल्याचं अभ्यासात दिसून आलं.
कृत्रिम तंतूपासून बनवलेले कपडे, वाहनांचे टायर, अन्न आणि पाण्याचं पॅकेजिंग, सौंदर्य प्रसाधनं आणि स्कीनकेअर, औद्योगिक प्रक्रिया हे MNP चे सर्वांत मोठे स्रोत आहेत. महासागरातील सर्व MNP पैकी सुमारे 35 टक्के कपड्यांमधून येतात. हे इतके लहान असतात की भिंगाशिवाय ते पाहणं कठीण असतं.
IIT पाटणाच्या एका संशोधनात पावसाच्या पाण्यातही मायक्रोप्लास्टिकचे कण आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे नद्या आणि तलावांमध्येही मायक्रोप्लास्टिक्स आढळून आल्याचं आणखी एका संशोधनातून समोर आलं आहे. कारखान्यांमधून बाहेर पडणारं सांडपाणी, शहरी भागातून बाहेर पडणारा कचरा अशा अनेक कारणांमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.
ज्या जमिनीवर शेती केली जाते, तिथेही मायक्रोप्लास्टिक मुबलक प्रमाणात आढळतं. काही संशोधनांतून असंही दिसून आलंय की जमिनीखालील भाज्यांमध्ये मायक्रोप्लास्टिकचं प्रमाण जास्त आढळतं. म्हणजेच मुळा, गाजर, बटाटे यांसारख्या भाज्यांमध्ये त्याचं प्रमाण जास्त असेल.
मानवी रक्तात आढळले मायक्रोप्लास्टिक्स
2022 मध्ये नेदरलँडच्या शास्त्रज्ञांना मानवी रक्तात मायक्रोप्लास्टिक्स सापडले होते. त्यांनी 22 लोकांच्या रक्ताचे नमुने घेऊन संशोधन केलं होतं. त्यापैकी 17 जणांच्या रक्तात प्लास्टिकचे कण आढळून आले होते. या रक्तात पाच प्रकारचे प्लास्टिक आढळले होते. यामध्ये प्रामुख्याने पॉलिमिथाईल मेथाक्रिलेट (PMMA), पॉलीप्रॉपिलीन (PP), पॉलिथिलीन (PE), पॉलिथिलीन टेरेफ्थालेट (PET) यांचा समावेश होता.