आजच्या जगात आधुनिक टेक्नॉलॉजीने मोठी बाजी मारली आहे. सध्या सगळीकडे AIचा बोलबाला आहे. मात्र याच AIचा वापर करून पिंपरी-चिंचवडमधल्या महिलेने चक्क अत्याधुनिक, वेगळा पाळणाच बनवला आहे. क्रेडलवाइजच्या पाळण्याचे अमेरिका व भारतात पेटंट घेण्यात आलं असून पाळण्याची विक्री, सेवा आता भारतात सुरू होत आहे.
सध्या आधुनिकतेच्या काळात कुटुंबातील सदस्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.अनेक कुटुंबातील लहान बाळांना आजी-आजोबांचा आणि आई-वडिलांचा हवा तेवढा सहवास मिळत नाही. त्यामुळे लहान बाळांच्या संगोपनात अनेक समस्या उद्भवतात. बाळाला पूर्ण वेळ झोप मिळाली तर त्याची शारीरिक व बौद्धिक वाढ व्यवस्थित होते. प्रत्येक पालकांना आपल्या बाळाची उत्तम काळजी घेणे आवश्यक वाटते. परंतु आई-वडील दोघेही नोकरी व्यवसायात व्यस्त असताना किंवा वर्क फ्रॉम होमच्या या जमान्यात बाळाच्या वाढीमध्ये अनेक समस्या उद्भवतात. याच समस्या लक्षात घेऊन त्या सोडवण्यासाठी क्रेडलवाइज कंपनीने एक अत्याधुनिक, AI तंत्रज्ञानाने युक्त असलेला, स्वयंचलित आधुनिक पाळणा तयार केला आहे.
काय आहे वैशिष्ट्य ?
AI ने बनवलेल्या या अत्याधुनिक पाळण्याचे वैशिष्ट्य म्हणजे या पाळण्यात ठेवलेले बाळ जाग झालं आणि हालचाल करू लागलं की त्याची सूचना मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे त्या बाळाच्या पालकांना मिळते. एवढचं नव्हे तर जागं झालेलं बाळ रडायला लागण्यापूर्वीच हा अत्याधुनिक स्वयंचलित पाळणा हळुवारपणे, पण तितक्याच सुरक्षितरित्या झोके देण्यासही सुरुवात करतो. विशेष म्हणजे आपण दूर असलो तरी या पाळण्याचं संपूर्ण नियंत्रण हे मोबाईलद्वारे देखील करता येतं. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामुळे बाळाच्या झोपेत व्यत्यय येत नाही आणि त्याची शांत झोप पूर्ण होते. AIचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या पाळण्यामध्ये अत्याधुनिक कॅमेरे आणि सेन्सरचाही वापर करण्यात आला आहे. तसेच या पाळण्याची सुरक्षाविषयक सर्व काळजी घेण्यात आलेली आहे. त्यामुळे येत्या काळात हा पाळणा खूप फायदेशीर ठरणार असून त्याला मोठी मागणी मिळताना दिसेल.