हिंदायान’ या सायकल मोहिम आणि ब्रेक जर्नी शर्यतीच्या २०२५-२६ सालाकरिताच्या वेळापत्रकास भारत सरकारच्या युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने अधिकृत मान्यता दिली आहे. मंत्रालयाने दिल्ली NCR, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांतील सरकारांना या मोहिमा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संपूर्ण वाहतूक व्यवस्था आणि नागरी मदत पुरवण्याचे आवाहन केले आहे.
संडे ऑन सायकल’ या केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या संकल्पनेचा विशेष उल्लेख पाच राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठविलेल्या पत्रात मंत्रालयाने केला आहे. संबंधित स्थानिक प्रशासनांनी या सायकल मोहिमांसाठी एम्ब्युलन्स, अग्निशमन दल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फिरती शौचालये, वाहतूक नियंत्रण आणि सायकलस्वारांच्या मार्गदर्शनासाठी पथप्रदर्शक वाहने यांसारख्या आवश्यक सेवा आणि सुविधा पुरवाव्यात, अशी विनंती केली आहे.
७ सायकल मोहिमा आणि दोन व्यावसायिक टप्पा सायकल शर्यती
यंदाच्या ‘हिंदायान’ यंदाच्या वेळापत्रकात एकूण ७ सायकल मोहिमा आणि दोन व्यावसायिक ( मल्टी स्टेज ) टप्पा सायकल शर्यतींचा समावेश आहे. यातील वैशिष्ट्य म्हणजे, तीन ‘जॉय रायड्स’ — ३० किमीपेक्षा कमी अंतर असलेल्या मार्गांवर हौशी सायकलस्वारांसाठी असणार आहेत. या सायकल मोहिमा नवी दिल्ली, जयपूर आणि ठाणे ते मुंबई या मार्गांवर होणार आहेत. दीर्घकालीन सायकलिंग स्पर्धात अहमदाबाद ते बडोदा आणि मुंबई ते पुणे अशा दोन ‘शतक’ सायकल स्पर्धा ( १०० किमी ) आणि दिल्ली ते आग्रा ही दुर्मिळ द्विशतक सायकल यात्रा ( २०० किमी ) देखील आयोजित केली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्ली ते आग्रा यमुना एक्सप्रेसवे मार्गावर सायकल चालवण्यास खास परवानगी दिली आहे. या मार्गावर नुकतेच भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानाने आपत्कालीन लँडिंग केली होती. सुरक्षेच्या दृष्टीने या गुळगुळीत महामार्गावर केवळ देशातील केवळ प्रमुख ३० सायकलपटूंनाच आयोजकांनी निमंत्रण दिले आहे. ही एक आगळावेगळी अडथळे मुक्त शर्यत अनुभवण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.
या मोहिमेत १९ फेब्रुवारी २०२६ रोजी, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निमित्त एक अनोखा “बाईक अँड हाईक” कार्यक्रम होणार आहे. यात सायकलस्वार पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा येथून सुरूवात करून सिंहगड किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत सायकलिंग स्पर्धा होणार आहेत. त्यानंतर किल्ल्याच्या माथ्यावर चढाई (हाईक) करणार आहेत.
असा होणार समारोप
‘हिंदायान’ सायकल शर्यतींचा समारोप २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात होणाऱ्या दोन १०० किमी व्यावसायिक ( मल्टी स्टेज ) टप्पा सायकल शर्यतींसह होणार आहे. बक्षिसांची माहिती नोव्हेंबर महिन्यात जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
हिंदायान ही “Tour de France” ठरावी
आपले स्वप्न आहे की हिंदायान ही भारतीय सायकलिंगमधील “Tour de France” प्रमाणे एक दीर्घकालीन सायकल मोहीम ठरावी असे भूमार्गाने पृथ्वीची प्रदक्षिणा करणारे ‘हिंदायान’ चे संस्थापक विष्णुदास चापके यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की जगप्रवासानंतर मला अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये अत्यंत चांगल्या नोकरीची संधी होती. जे कोट्यवधी लोकांचे स्वप्न असते, परंतू मी माझे स्वप्न निवडले. गेली पाच वर्षे मी पूर्णवेळ नोकरी स्वीकारलेली नाही. कारण माझे संपूर्ण लक्ष ‘हिंदायान’ कडेच केंद्रित केले आहे, असेही विष्णूदास चापके म्हणाले. हिंदायानच्या यशामागे सरकारची भक्कम साथ असल्याचेही त्यांनी सांगितले.
वेळापत्रक ( Timetable ):
दिनांक – कार्यक्रम
रविवार, ३० नोव्हेंबर २०२५ – दिल्ली सायकल परेड
रविवार, ७ डिसेंबर २०२५ – जयपूर जॉय रायड
रविवार, २१ डिसेंबर २०२५ – अहमदाबाद ते बडोदा शतक सायकल
रविवार, २५ जानेवारी २०२६ – दिल्ली ते आग्रा “वाह ताज” सायकल यात्रा
रविवार, ८ फेब्रुवारी २०२६ – ठाणे ते मुंबई
गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ – शिवजयंती विशेष सायकलिंग पुणे
रविवार, १५ मार्च २०२६ – मुंबई ते पुणे
शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६ – रत्नागिरी जिल्ह्यात १०० कि.मी. टप्पा शर्यत – पहिला दिवस
रविवार, १ मार्च २०२६ – रत्नागिरी जिल्ह्यात १०० कि.मी. टप्पा शर्यत – दुसरा दिवस