कोल्हापूर शहरातील अतिशय वर्दळीच्या महाद्वार रोडवर अपघाताची मोठी घटना घडली आहे. दैव बलवत्तर म्हणून यात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी मोठा अनर्थ टळला आहे.
या अपघातात एक मद्यधुंद कारचालक कोल्हापूरच्या महाद्वार रोडवरच्या वन-वेतून आत येत या मद्यधुंद कारचालकाने अनेक महिलांसह, भाविकांना धडक (Kolhapur Accident) दिली आहे. तर काही दुचाकींना सुद्धा जोरदार धडक दिली आहे. दरम्यान, शहर वाहतूक शाखेचे पोलीस आणि नागरिकांनी पाठलाग करून या कार चालकाला रोखल्याने मोठा अनर्थ टळला आहे. अशातच यावेळी संतप्त जमावाने मद्यधुंद कारचालका कपडे फाटेपर्यंत धुलाई केली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
….तर 10 माणसं मेली असती
या व्हायरल व्हिडिओमध्ये मोठ्या प्रमाणात जमलेल्या संतप्त जमावाने मद्यधुंद कारचालक प्रसाद दत्तात्रय सुतार आणि त्याच्या साथीदाराला चांगलाच चोप दिला आहे. यात त्याचे कपडे फाटेपर्यंत धुलाई केली आहे. वेळीच या कारचालकाला रोखलं नसतं तर पुढे मोठा अनर्थ होऊन यात 10 माणसं मेली असती असेही म्हटले आहे. दरम्यान या वेळी संतप्त जमावाने कार फोडण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना अडवले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पुढील कायदेशीर कारवाईही केली जात आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, जुना राजवाडा पोलिसांनी तपास केला असता मद्यधुंद कारचालक हा सांगलीचा असून प्रसाद दत्तात्रय सुतार असे त्याचे नाव आहे. यावेळी प्रसाद सुतार याच्यासह त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतलंय.
काठ्या-तलवारी घेऊन गावगुंडांची मध्यरात्री दहशत
दुसरीकडे, कोल्हापुरातील सासणे उद्यान परिसरातून अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यात काठ्या-तलवारी घेऊन गावगुंडांची मध्यरात्री दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. सोबतच यात 8 गाड्या देखील फोडल्या आहेत. कोल्हापुरातील सासणे उद्यान परिसरातील गुंडांची दहशतीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फोडलेल्या गाड्यांमध्ये 5 चारचाकी आणि 3 दुचाकींचा समावेश आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याची गाडी देखील गावगुंडांनी फोडली आहे. यात गुंडांनी तरुणाच्या कानावर देखील हल्ला केला असून यामध्ये त्याला 12 टाके पडले आहेत.