इचलकरंजी येथील शांतीनगर परिसरातील आरगे भवनजवळील ओढ्याच्या काठावर नॅचरल गॅस पाईप्सच्या साठ्याला भीषण आग लागली. आज सकाळी पावणेअकराच्या सुमारास लागलेल्या आगीने परिसर धुराने व्यापला होता.
आगीत सुमारे एक हजार ७०० मीटर लांबीच्या नॅचरल गॅस पाईप्सचा साठा जळून खाक झाला असून, सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग अनोळखीने लावल्याचा अंदाज असून, याबाबत गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आकाशात उसळणारे काळेकुट्ट धुराचे लोट तब्बल १० किलोमीटरवरूनही दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली होती.
ऑक्सिजन पार्कलाही आगीचा फटका
शांतीनगर परिसरातील आगीने केवळ पाईप्सचा साठाच जाळला नाही, तर त्यालगत असलेल्या महापालिकेच्या घन वन ऑक्सिजन पार्कलाही मोठा फटका बसला. कंपाऊंडलगत उभी असलेली अनेक झाडे आगीच्या तीव्र झळांनी होरपळून पूर्णपणे जळाली.
याबाबत अधिक माहिती अशी, शहरात नॅचरल गॅसचे भूमिगत जाळे उभारण्याचे काम सुरू आहे. एचपी ऑईल गॅस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत काम केले जात आहे. संबंधित पाईप्स उपाध्ये कन्स्ट्रक्शनकडे कामासाठी सुपूर्द केल्या होत्या. आरगे भवनजवळील ओढ्याच्या काठावर ओढ्यानजीकच्या असलेल्या महापालिकेच्या मोकळ्या जागेत या पाईप्सचा साठा केला होता.
आगीने पाईप्सना वेढा घालत काही मिनिटांतच परिस्थिती भीषण झाली. ज्वाळांनी उंच उसळी घेत परिसराला वेढा घातल्याने घटनास्थळी गर्दी झाली. मात्र, परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता अनेकांनी भीतीपोटी सुरक्षित अंतर राखले. महापालिकेच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. वेळीच केलेल्या प्रयत्नांमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महापौर उदय धातडे आणि नगरसेविका प्रमिला जावळे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.





