ताजी बातमी ऑनलाईन टीम
हिरव्या मिरचीचा ठेचा (Mirachi Thecha) म्हंटलं की, तोंडाला लगेच पाणी सुटतं. खर्डा असा एकमेव पदार्थ आहे, जो आमटीची, भाजीची, लोणच्याची कमी भरून काढून शकतो. शेताच्या बांधावर मळकटलेल्या कपड्यांमध्ये घामाघूम झालेला हातात भाकरी घेऊन त्यावर खर्डा ठेवून घास मोडणारा शेतकरी प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर उभा राहतो. घाटावरचा खर्डा खायला मिळणं ही एक मोठी पर्वणीच असते. आज त्याच गावरान ठेच्याची अर्थात खर्ड्याची रेसिपी साध्या-सोप्या पद्धतीने पाहू…
साहित्य
१) पंधरा-वीस हिरव्या मिरच्या
२) सात-आठ लसणाच्या पाकळ्या
३) अर्धा चमचा मीठ
४) दीड चमचा तेल
१) पहिल्यांदा हिरव्या मिरच्यांची डेखं काढून घ्यावीत. तसेच ते पाण्यात स्वच्छपणे धुवून घ्यावे.
२) त्यानंतर लसणाऱ्या पाकळ्या सोलून घ्यावेत.
३) मध्यम गॅसवर पॅन ठेवून तीन-चार चमचे पाणी घालून मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या टाकव्यात. त्यावर झाकण ठेवून किमान ५ मिनिटं वाफलून घ्यावे.
४) त्यानंतर झाकण काढून मिरच्या आणि लसूण कोरडे करून घ्यावेत.
५) थंड झाले की खलबत्त्यात कोरड्या केलेल्या मिरच्या आणि लसूण टाकावे, त्यात मीठ टाकून घ्यावे. तिन्हीही एकजीव होतील अशा पद्धतीने नीट कुटून घ्यावे.
६) नंतर पॅनवर तेल टाकून गरम होऊ द्यावे. त्यात कुटलेला ठेचा घालून थोडावेळ परतून घ्यावे. नंतर ठेचा एका बाऊलमध्ये काढून घ्यावा.
अशा पद्धतीने तुमचा गावरान ठेचा तयार झाला आहे. गरमागरम बाजरी किंवा ज्वारीची भाकरी घेऊन त्याबरोबर तयार केलेला खर्डा खाण्यास घ्यावा. अशा खर्डा (Mirachi Thecha) भाकरीबरोबर टेस्टी लागतो.
हेही लक्षात घ्या
ही रेसिपी गावरान आणि घाटावरचा खर्ड्याची आहे. आता कालानुसार त्यात बदल होत आलेले आहेत. त्यामुळे बऱ्यास गृहिणी आता आवडीनुसार कोथिंबीर, जिरे, हिंग घालतात. ते जर घालणार असाल तर, तेलात तळत असताना या वस्तू घालाव्यात. जर तुम्ही शेंगदाण्याचे कूट घालणार असाल, तर पुन्हा एकदा ठेचा खलबत्त्यात कुटून घ्यावे.