कोरोना व्हायरस नियंत्रणात येत असताना जनतेची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्यावर आता नवे संकट कोसळले आहे. आणखी एका नवीन आजाराचा संसर्ग वाढत आहे. राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. मुंबईपासून जवळ असलेल्या शहापूरमध्ये बर्ड फ्लूचा 300 हून अधिक कोंबड्या, बदके दगावली आहेत. कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याची बाब अहवालात स्पष्ट झाली आहे. पशुसंवर्धन विभागाने आतापर्यंत 15 हजारांहून अधिक कोंबड्यांना मारण्याची तयारी सुरू केली आहे.
मिळालेली माहिती अशी, की ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वेहळोली गावात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. मुक्तजीवन सोसायटीच्या फार्ममधील 300 हून अधिक कोंबड्या दगावल्या आहेत. यामुळे सर्तक झालेल्या पशुसंवर्धन विभागाने खबरदारीचा उपाय घेतला आहे. एक किलोमीटर परिघातील किमान 15 हजारांहून अधिक पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आता कुठेतरी नियंत्रणात येत असताना ‘बर्ड फ्लू’चे नवे संकट घोंघावू लागले आहे. देशात पुन्हा एकदा बर्ड फ्लूचा संसर्ग पसरत आहे. हिमाचल प्रदेश, केरळ, राजस्थान आणि मध्य प्रदेशासह देशातील अनेक राज्यांत बर्ड फ्लू अर्थात H5N1 व्हायरस वेगाने पसरत असल्याची माहिती समोर आली आहे. ‘H5N1’ हा मानवाला संक्रमित करणारा पहिला ‘एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस’ आहे. यापाठोपाठ आता महाराष्ट्रात देखील बर्ड फ्लूने डोके वर काढले आहे. नवीन संकटाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हाय अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.