ताजी बातमी ऑनलाईन टीम
रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरले असून त्यांच्या संपत्तीत तब्बल 24 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या ते 103 अब्ज अमेरिकन डॉलर एवढ्या संपत्तीचे मालक आहेत. लागोपाठ दुसर्या वर्षी त्यांनी हा बहुमान संपादला आहे. तथापि खरी कमाल केली आहे ती अदानी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा असलेल्या गौतम अदानी यांनी. ह्युमन ग्लोबल रिच लिस्टने नुकत्याच जाहीर केलेल्या तपशिलानुसार अदानी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षभरात तब्बल 153 टक्क्यांनी (49 अब्ज डॉलर्सची) वाढ झाली आहे. हा एक विक्रमच म्हटला पाहिजे.
आशियातील दुसर्या क्रमांकाचे सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनण्याचा बहुमान अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी पटकावला असून त्यांची एकूण संपत्ती आहे 81 अब्ज डॉलर एवढी. जगभरातील कोणत्याही उद्योगाने अशी अफाट वेगाने संपत्ती कमावलेली नाही.
आकड्यांच्या भाषेत सांगायचे तर अदानी उद्योग समूहाने दर आठवड्याला सहा हजार कोटी रुपयांची घसघशीत कमाई गेल्या वर्षभरात केली. अॅलन मस्क, जेफ बेझॉस आणि बर्नार्ड अरनॉल्ट या जगातील दादा उद्योगपतींनाही अदानी उद्योग समूहाने संपत्ती कमाईच्या वेगात खूपच मागे टाकले. गेल्या वर्षभरात ज्यांनी आपल्या संपत्तीत एक अब्ज डॉलरहून अधिक भर टाकली, अशा उद्योगपतींचा विचार केला तर भारत त्यात तिसर्या स्थानावर आहे.
भारतीय उद्योगपतींनी केलेली एकूण कमाई आहे 159 अब्ज डॉलर. जगातील अन्य उद्योगपतींच्या तुलनेत भारतीय उद्योगपतींनी कमावलेल्या संपत्तीचे आकडे अचंबित करणारे आहेत, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण या संदर्भात हुरून इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अनास रेहमान जुनैद यांनी नोंदवले.
गेल्या दहा वर्षांत भारतीय उद्योगपतींनी आपल्या संपत्तीत 700 अब्ज डॉलरची भर टाकली आहे आणि ही रक्कम स्वित्झर्लंडच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाइतकी आणि संयुक्त अरब अमिरातीच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या दुप्पट आहे, असेही जुनैद यांनी निदर्शनाला आणून दिले. सध्या भारतात राहणार्या अब्जाधीशांची संख्या 215 असून त्यात नव्याने 58 जणांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे भारत हा जागतिक पातळीवर अब्जाधीशांची संख्या धारण करणारा तिसर्या क्रमांकाचा देश ठरला आहे.
जगातील 18 टक्के लोकसंख्या भारतात आहे आणि जागतिक पातळीवर चमकणार्या भारतीय उद्योगपतींची टक्केवारी आठ अशी आहे. अर्थात, काही क्षेत्रांत भारतीय उद्योगपतींना पीछेहाटही सहन करावी लागली. शिक्षण क्षेत्रात बायजू रवींद्रन यांच्या बायजू समूहाने 3.3 अब्ज डॉलरची संपत्ती कमावली. जागतिक पातळीवर अशी कामगिरी बजावणारे ते तिसर्या क्रमांकाचे व्यावसायिक ठरले.
इंडिगो या विमान कंपनीचे राहुल गंगवाल हे 4.3 अब्ज डॉलर संपत्तीचे तर राहुल भाटिया हे 4.2 अब्ज डॉलर संपत्तीचे मालक आहेत. शिवाय सिमेंट उद्योगातील अग्रणी मानले जाणारे कुमार मंगलम बिर्ला हे 18 अब्ज डॉलर संपत्तीचे मालक आहेत. सिमेंट उद्योगात त्यांनी जागतिक पातळीवर आपला दबदबा निर्माण केला आहे.
जगभर बिस्कीट किंग म्हणून ओळखले जाणारे नुस्ली वाडिया हे 7.5 अब्ज डॉलर संपत्तीचे मालक आहेत. एचसीएल टेक्नॉलॉजीचे शिव नाडर हे 23 अब्ज डॉलरची संपत्ती बाळगून आहेत तर विश्व पातळीवर व्हॅक्सिन किंग अशी आपली ठळक ओळख निर्माण केलेले सायरस पूनावाला हे 26 अब्ज डॉलर संपत्तीचे, पोलाद सम्राट लक्ष्मीनिवास मित्तल हे 25 अब्ज डॉलर संपत्तीचे मालक आहेत.
डी मार्ट साखळीचे संस्थापक राधाकिशन दमानी, दिलीप संघवी हे 18 अब्ज डॉलर संपत्तीचे, उदय कोटक हे 16 अब्ज डॉलर्स संपत्तीचे तर हिंदुजा बंधू हे 23 अब्ज डॉलर संपत्तीचे मालक आहेत. थोडक्यात सांगायचे तर भारत म्हणजे जागतिक पातळीवर अब्जाधीश उद्योगपतींची निर्मिती करणारा कारखानाच ठरला आहे.