PUBG गेम खेळण्यासाठी मोबाइल हवा म्हणून पायी चालत जाणाऱ्या महिलेचे (Women) गंठण जबरदस्तीने हिसकावून पळून गेलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (ग्रामीण) पोलिसांनी ताब्यात (Arrested) घेतले आहे. अजय राजु शेरावत (वय- १८ रा. हिंगणगाव, ता. शिरूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगुरूनगर (ता. खेड) येथील मालती रामदास भगत या किराणा साहित्य आणण्यासाठी बाजारात गेल्या असता अज्ञात २ इसम हे दुचाकी गाडीवर येऊन गळ्यातील २ तोळे वजनाचे गंठण जबरदस्तीने हिसकावून पळून गेले असल्याची तक्रार खेड पोलीस ठाण्यात दिली होती. सदर घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करीत असताना गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिस कॉन्स्टेबल धिरज जाधव यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, सदर गुन्ह्यातील आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल हि हिंगणगाव येथील एक जण वापरत आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी सापळा रचून त्या वर्णनाची गाडी व वापरत असणाऱ्या एका तरुणास ताब्यात घेतले. ताब्यात घेतले असता त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव अजय राजु शेरावत असे सांगितले. वरील गुन्ह्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा त्याने त्याचे साथीदारसोबत केला असल्याचे अजय शेरावत याने सांगितले. आरोपी अजय शेरावत यास ताब्यात घेऊन पुढील तपास कामी खेड पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके , पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस हवालदार, अतुल डेरे, विजय कांचन, बाळासाहेब खडके, अमोल शेडगे, धिरज जाधव, दगडू विरकर, पूनम गुंड यांच्या पथकाने केली आहे.