मान्सून सक्रिय (Monsoon Active) होत असल्याने राज्याच्या विविध भागांत पावसाला सुरुवात झाली आहे. कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस (Heavy Rain) पडला. मध्य महाराष्ट्र आणि मराठड्यातही पावसाने हजेरी (Rainfall) लावली आहे.
मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
बुधवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड येथे सर्वाधिक ११६ मिलिमीटर, मालवण येथे ८२ मिलिमीटर पाऊस पडला. तर पालघर येथेही ९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांतही संततधार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील नगर, जळगाव, कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या.
चंद्रपूरच्या गोंडपिंपरीत ६० मि.मी.ची नोंद
विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, अमरावती, भंडारा, बुलडाणा, नागपूर या जिल्ह्यांत सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे. चंद्रपूरच्या गोंडपिंपरी येथे ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना, लातूर जिल्ह्यांतही अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली.