ताजी बातमी ऑनलाईन टीम
नागपुर; २७ वर्षीय प्रियकराने प्रेयसीसोबत प्रणयक्रीडा करण्यापूर्वी उत्तेजक गोळ्यांचे अतिसेवन केल्याने बेशुद्ध होऊन मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यातील सावनेर, सिल्लेवाडा येथील स्थानिक केशव लॉजमध्ये ही विचित्र घटना रविवारी ३ जुलै रोजी दुपारी घडल्याचे उघडकीस आले. तो व्यवसायाने वाहनचालक होता. २१ वर्षीय युवती त्याची प्रेयसी असून ती पांढुर्णा, मध्यप्रदेश येथील रहिवासी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकराने प्रणयक्रीडा करण्यापूर्वी गोळ्यांचे सेवन केले होते. काही वेळातच तो बेशुद्ध पडल्याची माहिती प्रेयसीने प्रियकराच्या धापेवाडा येथील मित्राला दिली. तत्काळ मित्र धापेवाडा येथून चारचाकीने सावनेर येथील केशव लॉजवर पोहोचला.
त्याला स्थानिक खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तोपर्यंत संबंधीत तरूण जिवंत होता, अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली.
प्रियकराची प्रकृती गंभीर असल्याने स्थानिक डॉक्टरांनी त्याला सावनेर येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्याचा सल्ला दिला. मात्र तत्पूर्वी अन्य डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. प्रियकराच्या खिशात उत्तेजन देणाऱ्या गोळ्या डॉक्टरांना मिळाल्याची माहिती आहे. डॉक्टरांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी विचारपूस करण्यासाठी पांढुर्णा, मध्यप्रदेश येथील प्रेयसीला ताब्यात घेतले. मृतकाचे त्याच्या प्रेयसीसोबत तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. येत्या दोन महिन्यांत दोघेही लग्न करणार होते. प्रियकर रविवार असल्याने सकाळी पांढुर्णा येथे गेला. तिला सोबत आणून थेट सावनेर येथील केशव लॉज गाठले.