गेल्या काही दिवसांत सायबर क्राईमचे प्रमाण बरंच वाढलंय.. त्यातही ऑनलाईन व्यवहार सुरु झाल्यापासून तर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.. काही दिवसांपूर्वी खात्यातून पैसे काढण्यासाठी बँकेत जावे लागत होते. तेथे स्लिप भरावी लागायची.. मग लांबलचक रांगेत उभे राहिल्यावर पैसे मिळत..
बॅंकांनी नंतरच्या काळात ठिकठिकाणी एटीएम केंद्र सुरु केले.. स्लिपची जागा एटीएम कार्डनं (ATM) घेतली. ही केंद्रे 24 तास सुरु असल्यानं कधीही पैशांची गरज भासल्यास ‘एटीएम’मध्ये जाऊन कार्डद्वारे पैसे काढता येऊ लागले.. एटीएमचा वापर वाढला, तसे फसवणुकीचे प्रमाणही वाढलं.
एटीएम वापरताना आजही अनेक जण काही चुका करतात.. नि त्याचाच फायदा घेऊन सायबर चोर नवनवीन पद्धती वापरुन लोकांची फसवणूक करीत असतात.. घामाचे दाम सुरक्षित राखण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असतं.. अशी फसवणूक टाळण्यासाठी नेमकं काय करायला हवं, याबाबत जाणून घेऊ या…
अशी घ्या काळजी..
– सगळ्यात महत्वाचं म्हणजे, तुमचे एटीएम (डेबिट) कार्ड कधीही, कोणालाही देऊ नका.. तसेच कधीही पिन नंबर शेअर करु नका.. बऱ्याचदा अशा प्रकारातूनच फसवणूक झाल्याचे समोर आलं आहे…
– अनेकदा एटीएमचा पिन लक्षात राहत नसल्याने, काही लोकांना हा पिन मोबाईलमध्ये किंवा कुठेतरी लिहून ठेवतात. काही जण तर कार्डवरच पिन लिहितात.. अशा वेळी कार्ड हरवल्यास खात्यातून पैसे काढले जाऊ शकतात.. त्यामुळे कधीही, कुठेही पिन नंबर लिहून ठेवू नका.. तो लक्षात ठेवा.
– तुम्हाला तुमचा पूर्ण एटीएम कार्ड नंबर व पिन नंबर कधीच बँक कर्मचारी, बँक ग्राहक सेवांद्वारे विचारला जात नाही. जर कोणी तुम्हाला कॉल करुन अशी माहिती विचारत असेल, तर कधीच देऊ नका.
– एटीएम मशिनमधून पैसे काढण्यास अडचण येत असेल, तर तेथील गार्ड किंवा बँक कर्मचाऱ्यांचीच मदत घ्या. अनोळखी लोकांना काहीही विचारु नका.. त्यातून तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते.
– तुमचा डेबिट कार्ड नंबर किंवा पिन नंबर कोणत्याही अज्ञात वेबसाइटवर सेव्ह करू नका. विश्वासार्ह वेबसाइटवरूनच ‘ऑनलाइन’ खरेदी करा.