जगभरात ‘अल्बिनो’ म्हणजेच सफेद पशुपक्षी अनेक असतात. मात्र, कावळ्याला सफेद रंगात पाहणे हा एक अनोखाच अनुभव ठरतो. सध्या पितृ पंधरवडा सुरू झाला आहे आणि आपल्याकडे या काळात कावळ्यांचे महत्त्वही वाढते. अशा वेळीच गुजरातमध्ये पांढरा कावळा दिसून आला आहे!
गांधीनगर जिल्ह्यातील दहेगाम तालुक्यातील धारिसाना गावात हा दुर्मीळ पांढरा कावळा आढळला असून या कावळ्याला पाहण्यासाठी अनेक लोक धावले! साधारण वीस दिवसांपूर्वी हा कावळा पहिल्यांदा एका चहाच्या टपरीजवळ आढळल्याचे धारिसानाचे सरपंच शैलेश पटेल यांनी सांगितले.
ते रोज पक्ष्यांना शेव आणि गाठी देतात. एक दिवस शेव खाण्यासाठी येणार्या कावळ्यांमध्ये त्यांना हा पांढरा कावळा दिसला. तो अन्य कावळ्यांपासून दूरच राहत होता आणि कदाचित त्याला अन्य कावळ्यांनी आपल्यामध्ये सामावून घेतले नसावे, असे त्यांनी सांगितले.
दुर्मीळ पशुपक्ष्यांचे फोटो काढणार्या निमेश नाडोलिया व त्यांचा मित्र हर्ष डोडिया यांनी या गावात जाऊन पांढर्या कावळ्याचे अनेक फोटो टिपले व ते सोशल मीडियात पोस्ट केले. रंगद्रव्यांच्या अभावामुळे असे अल्बिनिझम विकसित होत असते.