इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणी योजनेची अंमलबजावणी व कार्यवाही त्वरित सुरु झाली पाहिजे, या मागणीसाठी बुधवार दि. २३ ऑगस्ट रोजी अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण इचलकरंजी बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच सकाळी १० वाजता प्रांत कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.
शहरातील तमाम इचलकरंजीकर बंधुभगिनींनी आपल्याला भागातील सर्व व्यवहार बंद ठेवून महिला, विद्यार्थी व कुटुंबियांसह या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी हजारोंच्या संख्येने सकाळी ठीक १० वाजता म. गांधीजींच्या पुतळ्यानजीक उपस्थित रहावे, असे आवाहन इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समन्वय समितीच्यावतीने आज इचलकरंजी येथील वीज ग्राहक संघटना कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आले आहे. म. गांधी पुतळा ते कॉ. मलाबादे चौक – जनता बँक ते छ. शिवाजी महाराज पुतळा – शिवतीर्थ ते प्रांत कार्यालय असा मोर्चाचा मार्ग राहील.
मोर्चातील फक्त १० महिला प्रांत अधिकारी यांना निवेदन देतील. मोर्चासमोर फक्त निवेदन वाचन केले जाईल. अन्य कोणतीही भाषणे होणार नाहीत, अशीही माहिती यावेळी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील, राज्यातील व देशातील सर्व भारतीय नागरिकांना कायमचे सामावून घेणाऱ्या, प्रत्येक हाताला काम देणाऱ्या व जिल्ह्यातील हजारो हातांना रोजगार देणाऱ्या वस्त्रनगरी इचलकरंजीच्या ४ लाख जनतेच्या भवितव्यासाठी सुरु असलेल्या या चळवळीमध्ये सर्वांनी आपले सहकार्य व बहुमोल योगदान द्यावे” असेही आवाहन यावेळी समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.