एका गावातल्या शेतातून रात्रंदिवस येणाऱ्या एका विचित्र आवाजाने लोक हैराण झाले होते. अखेर जेव्हा लोक त्या शेतात पोहोचले तेव्हा तिथे त्यांना धक्कादायक दृश्य दिसलं. एक मोठा किंग कोब्रा साप पाहून ते थक्क झाले.
लोकांनी वनविभागाला किंग कोब्रा पकडण्याची विनंती केली. माहिती मिळताच वनविभाग घटनास्थळी पोहोचला असता तेथील गोंधळामुळे सावध झालेला कोब्रा गायब झाला. मात्र, त्या ठिकाणी वनविभागाला जे आढळून आलं, ते पाहून ग्रामस्थ घाबरले. तिथे किंग कोब्राची अंडी सापडली. घटना कन्नूरमधील आहे
ही अंडी पाहून गावकऱ्यांना समजलं, की किंग कोब्रा पुन्हा त्या शेतात येऊ शकतो. त्यामुळे, ती अंडी तिथून हटवण्याची मागणी त्यांनी सुरू केली. यानंतर वनविभागाने तोडगा काढला. त्यांनी या संदर्भात वन्यजीव संरक्षण संस्थेचे (MARC)सक्रिय सदस्य शाजी बेक्कलम यांच्याकडे मदत मागितली. यानंतर शाजी बेक्कलम यांनी ही विषारी सापाची अंडी आपल्या घरात ठेवण्याचं मान्य केलं. एवढंच नाही तर त्यांच्यापासून कोब्राची पिल्ले तयार करण्याचंही मान्य केलं. त्यांनी आपल्या गावातील घरात कृत्रिम अधिवास तयार करून 16 किंग कोब्राची पिल्ले तयार केली आहेत.
कोब्राची पिल्लं अंड्यातून बाहेर येण्यासाठी पूर्णपणे नैसर्गिक परिस्थिती निर्माण करण्यासाठी जुन्या फिश टँकचा वापर करण्यात आला. शाजी म्हणाले की, केरळमध्ये कृत्रिम इनक्यूबेटरमध्ये किंग कोब्राच्या अंड्यांपासून पिल्लांची निर्मिती करण्याची ही पहिलीच वेळ आहे. शाजी गेल्या 13 वर्षांपासून वन्यजीव संवर्धन कार्यात व्यस्त आहेत. मात्र, त्यांनी कधीही किंग कोब्राची अंडी उबवण्याचा प्रयत्न केला नाही. अजगर, ओरिएंटल रॅट स्नेक इत्यादींची अंडी उबवण्यात यापूर्वी यश मिळाल्याचं शाजी यांनी सांगितलं.
मात्र, यावेळी अंडी विषारी सापाची असल्याने त्यांचे कुटुंबीय घाबरले. नंतर, त्यांनी परिस्थितीशी जुळवून घेतलं. कृत्रिम वातावरणात तापमान आणि आर्द्रता राखणं हे शाजीसमोरील सर्वात मोठं आव्हान होतं. सापाच्या अंड्यांसाठी 24 ते 30 अंश सेल्सिअस तापमान आणि कमाल आर्द्रता आवश्यक असते. 20 एप्रिल रोजी ही अंडी सापडली होती. सापाची पिल्लं बाहेर येण्यासाठी साधारणपणे 90 ते 110 दिवस लागतात. पिल्लं बाहेर येण्यासाठी 87 दिवस लागले. किंग कोब्रा सापाच्या पिल्लांमध्ये प्रौढ सापाइतकंच विष असतं. आठवडाभरात या सापांना जंगलात सोडण्यात येणार आहे.