येत्या काही दिवसांतच बुद्धीच्या देवतेचं, लाडक्या आराध्य दैवताचं गणरायाचं आगमन होणार आहे. 7 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाचा आरंभ होतो. 10 दिवस म्हणजे 17 सप्टेंबरपर्यंत हा उत्सव चालणार आहे. गणरायाच्या आगमनसाठी घरदार सज्ज झालं आहे.
अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांचीही लगबग वाढली असून गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्यात येत आहे.
यंदा वरूण राजाने चांगली कृपा केल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे . चार दिवसांवर आलेला गणेश उत्सव त्यामुळे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे .यंदाच्या वर्षी मंडळांची संख्याही वाढली असून त्यामुळे गणरायाच्या मूर्तींनाही अधिक मागणी आहे.
विविध कार्यशाळांमध्ये चार ते बारा फूट उंचीपर्यंतच्या मूर्त्या कारागिरांकडून तयार करण्यात येत असून त्यावर शेवटचा हात फिरवला जात आहे.
महाराष्ट्र आणि देशातील प्रमुख शहरांसोबतच परदेशातही या मूर्त्यांना मोठी मागणी असते. यंदा रंग, कच्चा माल,इमिटेशन ज्वेलरी अशा सर्वच गोष्टी महागल्यानं, मूर्तीच्या किमतीतही वाढ झाली आहे.
17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला निरोप देत त्याचे विसर्जन करण्यात येणार आहे.