राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या महायुती सरकारचा शपथविधी नुकताच मुंबईतील आझाद मैदानावर पडला. या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आता आमदारांच्या शपथविधीसाठी (MLAs oath Taking Ceremony) शनिवारपासून विधानसभेचे विशेष अधिवेशन (Vidhansabaha Adhiveshan) सुरु होणार आहे. शनिवारी आणि रविवारी 288 आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येईल. नव्या आमदारांना शपथ देण्यासाठी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते कालिदास कोळंबकर यांची निवड करण्यात येईल. ते सर्व आमदारांना शपथ देतील.
दोन दिवसांत नव्या आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर सोमवारी विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची निवड केली जाईल. विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा भाजप नेते राहुल नार्वेकर यांचीच वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. यंदाच्या विधानसभेत पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांची संख्या 78 इतकी आहे. या सर्व आमदारांच्या आगामी काळातील कामगिरीबद्दल राज्यातील जनतेला उत्सुकता आहे.
दरम्यान, एकीकडे आमदारांच्या शपथविधीची लगबग सुरु असताना दुसरीकडे महायुतीच्या गोटात मंत्रिमंडळातील खातेवाटबाबात खलबते सुरु आहेत. शनिवारी यासंदर्भात महायुतीच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत कोणाच्या वाट्याला किती मंत्रीपदं आणि कोणती खाती येणार, याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदं मिळणार?
विधानसभेच्या एकूण संख्याबळाच्या 15 टक्के मंत्रिमंडळाचा आकार असण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात 43 जणांचा समावेश होऊ शकतो. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांचा शपथविधी पार पडला आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळात केवळ 40 जणांची जागा शिल्लक आहे. या 40 खात्यांमध्ये तिन्ही पक्षाच्या मंत्र्यांना सामावून घेण्याची कसरत महायुतीला करावी लागणार आहे. महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला सर्वाधिक 21 ते 22 मंत्रिपदे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजितदादा गटाला नेमकी किती आणि कोणती मंत्रीपदं मिळणार, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.