येथील हनुमाननगर, जवाहरनगर परिसरात बसवलेल्या विजेच्या स्मार्ट मीटरमुळे जुन्या बिलाच्या तुलनेत सातपट, आठपट वीज बिल येत आहेत. त्यामुळे भागातील नागरीकांचा हे स्मार्ट मीटर बसवण्यात विरोध होत आहे. यातून भागातीलू नागरीक एकत्र आले आणि स्मार्ट मीटर बसवणाऱ्या वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरुन बसवलेली मीटर काढण्याची मागणी केली.
येथील हनुमाननगर, जवाहरनगर परिसरात वीज मंडळाचे कर्मचारी स्मार्ट वीज मीटर बसवल्यास वीज बिल कमी येत आहे, तुम्हीही बसवा असे सांगत तर काही ठिकाणी जबरदस्तीने वीज मिटर बसवत आहेत. मात्र, आता सात ते आठपट वीज बिले आल्याने नागरीकांचा स्मार्ट मीटर बसवण्यात विरोध आहे. तरीही वीज मंडळाचे कर्मचारी स्मार्ट मीटर बसवत आहेत. त्याला विरोध करत भागातील नागरीक एकत्र जमले. यावेळी नागरीकांनी माजी सभापती राजू बोंद्रे यांना पाचारण केले. बोंद्रे यांच्यासह नागरीकांनी परवानगीशिवाय जबरदस्तीने स्मार्ट मीटर का बसवत आहात ? यासह अनेक प्रश्नांचा भडीमार करत स्मार्ट मीटर बसवणाऱ्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.
तसेच जबरदस्तीने स्मार्ट वीज मीटर बसवु नका आणि बसवलेले स्मार्ट मीटर काढुन जुने मीटर बसवण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे लोकप्रतिनिधींसह नागरीकांचा विरोध लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांनी बसवलेले स्मार्ट मीटर काढुन घेण्याचे काम सुरु केले आहे.